चिन्मयी साहू मृत्यू प्रकरण, प्रियकराची आज लाय डिटेक्शन टेस्ट करणार !
वीर सुरेंद्र तंत्रज्ञान विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी चिन्मयी साहू प्रकरणी तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राची आज लाय डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे.
संबळपूर : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या चिन्मयी प्रियदर्शनी साहू मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिक वाढत चालले आहे. चिन्मयीच्या मृत्यूला नेमके कारणीभूत कोण आहे याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आपल्या तपासाचा रोख आता चिन्मयीच्या बॉयफ्रेंडच्या दिशेने वळवला आहे. या प्रकरणात ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्याचा निर्धार पोलिसांनी केला असून, याच अनुषंगाने आज चिन्मयीचा कथित बॉयफ्रेंड प्रीतीमन डे आणि त्याचा आणखी एक मित्र मानस टूडू या दोघांची ‘लाय डिटेक्शन टेस्ट’ केली जाणार आहे. यासाठी या दोघांना संबळपूर येथून बुरलाम येथे नेण्यात आले आहे.
हे दोघे चिन्मयीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या काही गुप्त गोष्टींचा उलगडा करत नसल्याचा संशय आहे. तथापि ‘लाय डिटेक्शन टेस्ट’ करण्यात आल्यानंतर दोघांच्या तोंडून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चिन्मयी ही वीर सुरेंद्र तंत्रज्ञान विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी आहे.
चिन्मयीच्या मृत्यू प्रकरणाचा तीन पोलीस पथकांकडून कसून तपास
चिन्मयीच्या मृत्यूमागील सत्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. हे हत्याकांड असल्याचा दाट संशय असून, या प्रकरणात निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची तीन पथके कसून तपास करीत आहेत. एकीकडे पोलीस तपासाला वेग मिळाला असतानाच दुसरीकडे पीसी ब्रिजच्या परिसरातून ठोस पुरावे गोळा करण्यासाठी शास्त्रज्ञांचे पथक कामाला लागले आहे. तसेच भुवनेश्वर येथे गेलेले बुर्ला पोलिसांचे पथक चिन्मयच्या मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास करून शुक्रवारी माघारी परतले.
चिन्मयी ही भुवनेश्वर येथे ज्या ठिकाणी राहत होती, त्या ठिकाणाहून पोलिसांनी चिन्मयीची बॅग, तिचा लॅपटॉप तसेच इतर कागदपत्रे हस्तगत केली आहेत. चिन्मयीची गळा दाबून हत्या केली गेल्याचा संशय असून शवविच्छेदन अहवालात चिन्मयीच्या गळ्याभोवती तशा खुणा सापडल्याचे कळते.
घरच्यांनी वर्तवली हत्येची शक्यता
चिन्मयीच्या घरातील मंडळींनी हत्येची शक्यता वर्तवली आहे. आमची चिन्मयी आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा तिची आई आणि इतर कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याच अनुषंगाने पोलिसांनी चिन्मयीचा बॉयफ्रेंड आणि तिच्या अन्य दोन मित्रांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चिन्मयीने विद्यापीठातील दीक्षांत समारंभानंतर पॉवर चॅनेल ब्रिजवरून उडी घेतल्याप्रकरणी पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. दीक्षांत समारंभात तिने पदवीचे प्रमाणपत्र घेतले होते. 1 मार्च रोजी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.