मित्रच मित्रासाठी काळ बनून आला, दोघांच्या मैत्रीत ती आली अन्…
दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. एकत्रच नोकरी करायचे. पण एका गोष्टीमुळे त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले आणि मग मित्रच मित्राच्यावर जीवावर उठला.
गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : प्रेमसंबंधाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानकावजव आढळलेल्या मृतदेहाबाबत उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बोरिवली जीआरपीने 12 तासात आरोपीला अटक केली आहे. चुटकन रामपाल साफी असे अटक आरोपीचे नाव आहे. संदेश महादेव पाटील असे मृताचे नाव असून, तो नेरूळ नवी मुंबई येथील रहिवासी आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दोघेही बँकेत एकत्र नोकरी करायचे
बोरिवली जीआरपीला 15 मे रोजी रात्री 10.30 च्या सुमारास जोगेश्वरी राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ एका 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा तरुण गेल्या एक वर्षापासून जोगेश्वरी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड विक्री क्षेत्रात कार्यरत होता. पोलिसांना बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली आणि सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला. तपासात मृताचा मित्र चुटकन रामपाल साफी यानेच त्याचा खून केल्याचे समोर आले. बोरिवली जीआरपीने अवघ्या 12 तासात हत्येची उकल केली आहे.
पोलिसांनी 12 तासात आरोपीला अटक केली
आरोपी आणि मयत तरुण एचडीएफसी बँकेत एकत्र कामाला होते. आरोपी चुटकनची प्रेयसी काही महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेली. यानंतर ती मृत संदेश पाटीलची मैत्रीण झाली होती. याच गोष्टीचा चुटकनच्या मनात खदखदत होता. यातूनच संधी साधत त्याने संदेश पाटील याची हत्या केली. मृतदेह राम मंदिर स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ टाकून पसार झाला. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला जोगेश्वरी येथून अटक केली.