रागाने घर सोडून आलेल्या मुलींना करायचे टार्गेट, मदत करण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात अडकवायचे अन्…
बस डेपो आणि रेल्वे स्थानकात काही कारणातून घरातून नाराज होऊन पळून आलेल्या मुलींना आरोपी हेरायचे. यानंतर या मुलींना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना फूस लावून घेऊन जायचे.
कानपूर : मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीचा कानपूरमध्ये पर्दाफाश झाला आहे. अल्पवयीन मुलींना टार्गेट करुन त्यांना विकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. बस डेपो आणि रेल्वे स्थानकात काही कारणातून घरातून नाराज होऊन पळून आलेल्या मुलींना आरोपी हेरायचे. यानंतर या मुलींना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना फूस लावून घेऊन जायचे. त्यानंतर त्यांची विक्री करायची. आरोपींनी आतापर्यंत सहा मुलींना अशा प्रकारे विकल्याची कबुली दिली.
‘असा’ झाला खुलासा
काही दिवसांपूर्वी कानपूरमधील रायपुरा येथून 14 वर्षाची मुलगी घरातून नाराज होऊन निघून गेली होती. रायपुरा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्त झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली.
ही टीम रेल्वे स्टेशन, रोडवेज बस स्थानकावर मुलीची चौकशी करत होती. चौकशीदरम्यान पोलिसांना राजू उर्फ इकबाल आणि त्याची पत्नी पूजा उर्फ चांदनी यांच्या टोळीची माहिती मिळाली. तात्काळ अॅक्शन मोडमध्ये येत पोलिसांनी या टोळीतील सहा जणांना अटक केली.
पोलीस चौकशीत आरोपींनी केला धक्कादायक खुलासा
पोलिसांनी या टोळीची चौकशी केली असता या टोळीने सदर मुलीला विकल्याचे कळले. अनवरगंज स्टेशनवर सदर मुलीला पूजाने आधी चहा, नाश्ता देत तिची विचारपूस करत आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर बदायू येथे मुलीची 50 हजार रुपयात विक्री केली.
ही टोळी रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर अशा मुलींना टार्गेट करुन त्यांना विवाहासाठी विकायचे. आतापर्यंत सहा मुलींची त्यांनी विक्री केल्याची कबुली दिली आहे. या टोळीतील अन्य सदस्यांचा पोलीस शोध घेत आहेत.