Ambernath Couple Death : शिर्डीला दर्शनासाठी चालले होते कुटुंब, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं; काय घडलं नेमकं?
वैशाली यांना त्यांच्या कंपनीकडून शिर्डी साईबाब दर्शनाचे फ्री पास मिळाले होते. पत्नीच्या आग्रहाखातर नरेश हा पत्नी आणि दोन मुलींसोबत शिर्डीला जायला निघाले.
अंबरनाथ : देवदर्शनाला चाललेल्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला अन् एका क्षणात दोन मुली आई-वडिलांच्या मायेला पारख्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे अंबरनाथमधील मोरीवली गावातील उबाळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. नरेश उबाळे आणि वैशाली उबाळे अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. उबाळे कुटुंबीय बसने शिर्डीला दर्शनासाठी चालले होते. मात्र शिर्डीला पोहचण्याआधीच वाटेत त्यांचा घात झाला. त्यांच्या बसला सिन्नर महामार्गावर अपघात झाला आणि अपघातात दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.
नरेश उबाळे हे एका अंबरनाथच्या जनता वाईन शॉपमध्ये काम करत होते. यामुळे उबाळे यांना सुट्टी मिळणे अवघड असायचे. वैशाली उबाळे या घरच्या घरी बॉक्स पॅकिंगची काम करत होती. या दोघांना दोन मुली आहेत.
पत्नीला कंपनीतून शिर्डीचे फ्री पास मिळाले होते
वैशाली यांना त्यांच्या कंपनीकडून शिर्डी साईबाबा दर्शनाचे फ्री पास मिळाले होते. पत्नीच्या आग्रहाखातर नरेश हा पत्नी आणि दोन मुलींसोबत शिर्डीला जायला निघाले. त्यानुसार उबाळे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुली असे हे चौकौनी कुटुंब गुरुवारी रात्री अंबरनाथमधून कंपनीच्या मालकाने व्यवस्था केलेल्या बसने शिर्डीला चालले होते.
शिर्डीला पोहचण्याआधीच काळाने झडप घातली
मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिर्डीला पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि या चौकोनी कुटुंबाचे दोन महत्त्वाचे कोपरे निखळून पडले. कारण घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ त्यांच्या बसचा एका डंपर सोबत भीषण अपघात झाला.
अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
या अपघातात नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैशाली उबाळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय त्यांची एक मुलगीही जखमी झाली, तर दुसऱ्या मुलीला मात्र सुदैवाने काहीही इजा झाली नाही.
या घटनेमुळे उबाळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नरेश आणि वैशाली यांची यांच्या दोन मुली मात्र आई-वडिलांच्या मायेला कायमच्या पारख्या झाल्या आहेत.