पत्नीला घरच्यांसोबत रहायचे नव्हते, मग पतीने ‘असा’ काढला मार्ग, पाहून सर्वच हादरले !
पतीला कुटुंबासोबत रहायचे होते, पण पत्नीला सासरच्यांसोबत रहायचे नव्हते. या कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला अन् पुढे जे घडले ते विपरीत होते.
ठाणे : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गाजवळ फेकून दिला. रश्मा अब्दुल रहेमान अन्सारी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कौटुंबिक वाद टोकाला गेला आणि यातूनच पतीने पत्नीला संपवल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर आढळला मृतदेह
मुंबई-नाशिक महामार्गावरील पाईपलाईनच्या मागे एका प्रवाशाला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रवाशाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्याला मार लागल्याचे निष्पन्न झाले.
कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीला संपवले
पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत महिलेची ओळख पटवली. यानंतर महिलेच्या पतीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. पत्नीला सासरच्या लोकांसोबत रहायचे नव्हते. या कारणातून पती-पत्नीचे भांडण झाले. याच भांडणातून आरोपीने टोकाचे पाऊल उचलले. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गावर पाईपलाईनजवळ फेकला. भिवंडी तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मुंबईत चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर अॅसिड फेकले
चारित्र्याच्या संशयातून 70 वर्षीय पतीने 56 वर्षीय पत्नीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी वडाळा येथे घडली. सुदैवाने यात पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. महिलेवर उपचार करुन तिला घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.