छतावरुन पडून महिलेचा मृत्यू, मग आठ वर्षाची मुलगी ‘असं’ का म्हणाली?
प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजीव तेथून फरार झाला आहे. पोलिसांनी पतीला पकडण्यासाठी एक टीम रवाना केली आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.
इटावा : कौटुंबिक कारणातून पतीने पत्नीची हत्या करुन बालकनीतून खाली फेकल्याची घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे घडली आहे. टेरेसवरून पडल्यानंतर नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मात्र वडिलांनीच आईची हत्या करुन छतावरुन फेकल्याचा आठ वर्षाच्या मुलीने आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नेमके काय घडले?
आई आणि मी दोघी रात्री झोपलो असताना वडिल आले आणि त्यांनी आईचा गळा आवळला. त्यानंतर तिला बाल्कनीतून खाली फेकले, असे मयत महिलेच्या मुलीने सांगितले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर सत्य समोर येईल.
पेशाने शिक्षक आहे आरोपी
कोतवाली क्षेत्रातील घटिया अजमत अली येथे राजीव कुमार आपल्या कुटुंबासोबत राहतो. राजीव कुमार पेशाने शिक्षक आहे. राजीव कुमारचा 11 वर्षांपूर्वी मयत महिलेसोबत विवाह झाला होता. त्यांना 8 वर्षाची मुलगीही आहे.
मयत महिला पिझ्झाच्या दुकानात काम करायची
मयत महिला पिझ्झाच्या दुकानात काम करत होती, तर राजीव कुमार कोचिंग क्लास घ्यायचा. पती-पत्नीमध्ये कशावरुन वाद होता याबाबत अद्याप कळू शकले नाही. पत्नीची हत्या केल्यानंतर राजीव कुमार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुलीकडून वडिलांवर आईच्या हत्येचा आरोप
पत्नीची हत्या केल्यानंतर राजीव कुमारने घरच्यांना ती छतावरुन पडल्याचे सांगितले. तर महिलेच्या बहिणीला पत्नी शिडीवरुन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र राजीवच्या 8 वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांवर आईच्या हत्येचा आरोप केला.
जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले
महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत महिलेच्या नातेवाईकांना कळवले.
आरोपी पती फरार
महिलेच्या मुलीने प्रकरणाची माहिती दिली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजीव तेथून फरार झाला आहे. पोलिसांनी पतीला पकडण्यासाठी एक टीम रवाना केली आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.