आधी पत्नीला संपवले, मग मृतदेहावर फुले वाहिली; पतीने का उचलले टोकाचे पाऊल?
विशेष म्हणजे पत्नीला जीवे मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर फुले अर्पण करून आरोपीने तिला श्रद्धांजलीही वाहिली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण तेनाली शहरात खळबळ उडाली आहे.
तेनाली : लिव्ह इन रिलेशनशिप, विवाहबाह्य संबंध यातून अलीकडच्या काळात गुन्हेगारीला निमंत्रण मिळू लागले आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून जोडीदाराबरोबर कटुता निर्माण होत चालली आहे. अशा दाम्पत्यांमध्ये टोकाचे वाद होऊन त्या वादाचे हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतर होऊ लागले आहे. अशाच प्रकारे आंध्र प्रदेशातील तेनाली शहरात घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वारंवार भांडण सुरू ठेवले. याच वादातून अखेर पतीने संतापाच्या भरात पत्नीला चाकूने भोसकले आणि तिची निर्घृण हत्या केली.
विशेष म्हणजे पत्नीला जीवे मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर फुले अर्पण करून आरोपीने तिला श्रद्धांजलीही वाहिली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण तेनाली शहरात खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने स्वतःचा गुन्हा कबूल देखील केला आहे.
स्वाती राव असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर ककरला वेंकट कोटय्या राव असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.
पत्नीच्या ब्युटी पार्लरमध्ये घुसून केला वाद
हत्या झालेली महिला नेहमीप्रमाणे ब्युटी पार्लरमध्ये काम करण्यासाठी गेली होती. याचदरम्यान आरोपी पतीने ब्युटी पार्लरमध्ये घुसून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने स्वतःजवळील चाकूने महिलेच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर सपासप वार केले. यामुळे महिला रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली.
चाकूहल्ल्यांमध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पत्नीची संशयावरून निष्कारण हत्या केल्याचा पश्चाताप नंतर आरोपीला झाला. त्याने पत्नीच्या मृतदेहावर फुलांचा हार चढवून श्रद्धांजली अर्पण केली.
आरोपीने पोलिसांपुढे पत्करली शरणागती
ककराला हा ट्रक ड्रायव्हर आहे. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता. या संशयातून तो वारंवार पत्नीचा छळ करत असे. घटनेदिवशी आरोपी दारू पिऊन आला होता.
दारूच्या नशेत तो पत्नीच्या ब्युटी पार्लरमध्ये शिरला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांपुढे शरणागती पत्करली. आरोपीने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.