मद्यधुंद कार चालकाची स्टंटबाजी मजुराच्या जीवावर बेतली, अपघातात अन्य दोन जण जखमी
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात तरुणांना अटक केली आहे. धडक इतकी जोरदार होती की यात मजूर हवेत उडून जमिनीवर आदळला.
गुरुग्राम : मद्यधुंद कार चालकाच्या स्टंटबाजीचा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. स्टंटबाजी करताना कारचा धडक बसून एका वृ्द्ध कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये घडली आहे. तसेच अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात तरुणांना अटक केली आहे. धडक इतकी जोरदार होती की यात मजूर हवेत उडून जमिनीवर आदळला.
गुरुग्राममधील उद्योगनगर येथील दारूच्या अड्ड्याबाहेर ही घटना घडली आहे. येथील सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. रविवारी रात्री येथे अनेक कामगार दारू उतरवण्याचे काम करत होते.
मद्यधुंद कार चालक स्टंटबाजी करत होता
इतक्यात एका पांढऱ्या रंगाची गाडी आली. या कारमधील मद्यधुंद कारचालक स्टंटबाजी करू लागला. सर्व कामगार एका बाजूला उभे राहून कारचा स्टंट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग कार चालक गाडी भरधाव वेगात गाडी मजुरांजवळ आणून वळवण्याचा प्रयत्न करत होता.
गाडी अनियंत्रित झाल्याचे मजुरांच्या लक्षात येताच सर्व मजूर जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. मात्र वृद्ध मजुराला काय होतंय हे लक्षात आलं नाही आणि तो जागीच उभा राहिला. अनियंत्रित गाडी कामगाराला जोरदार धडक देते.
एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
धडक इतकी जोरदार होती की मजुर हवेत उडून जमिनीवर पडला. या अपघातात मजुराचा जागीच मृ्त्यू झाला. तर अन्य दोन मजुर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेवेळी कारमध्ये उपस्थित असलेल्या सात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते.