लक्झरी कार, आलिशान व्हीला दाखविला, तरुणींना लाखो रुपायांना असा फसवला !
त्याच्या आई-वडीलांनी लग्न जमण्यासाठी त्याचे नाव मॅट्रीमोनियल वेबसाईटवर नोंदविले आणि त्याने मुलींवर इम्प्रेशन मारायला सुरुवात केली.
नवी दिल्ली : मॅट्रीमोनियल वेबसाईटवरून तरूणींना फसविणाऱ्या अनेक लखोबा लोखंडेच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. परंतू उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर राहणाऱ्या एका लखोबा लोखंडेने तरूणीला श्रीमंत असल्याचे भासवून कसे फसविले ? याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. चांगला शिकला सवरलेला हा तरूण आधी मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत काम करायचा, मग नंतर त्याने स्वत:चा बिजेनस सुरू केला. परंतू त्यात देखील फटका बसल्याने त्याने मॅट्रीमोनियल साईटवर प्रोफाईल तयार करीत मुलींना महागड्या लक्झरी कार आणि व्हीला दाखवित फशी पाडले आणि त्यांच्याशी मैत्री करीत लाखो रूपयांना त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर राहणाऱ्या विशाल याने मॅट्रीमोनियल साईटवर लग्न इच्छुक महिलांशी मैत्री करीत त्यांच्या समोर प्रचंड श्रीमंत असल्याचे नाटक केले. त्यासाठी त्याने लक्झरी गाडी आणि गुडगाव जवळील एक व्हीला आणि फार्महाऊस त्याच्या मालकीचे असल्याचे प्रोफाईलवर भासविले. त्यामुळे तरूणी त्याच्यावर इम्प्रेस होऊन भाळल्या. त्यानंतर त्यांची ओळख वाढवून त्याने त्यांची अनोख्या पद्धतीने फसवणूक केली.
विशाल हा सुशिक्षित तरूण असून तो बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर म्हणून कामाला होता. त्याने नंतर एक व्यवसाय सुरू केला होता. परंतू त्यात नुकसान झाल्याने त्याच्या आई-वडीलांनी लग्न जमण्यासाठी त्याचे मॅट्रीमोनियल वेबसाईटवर नाव नोंदविले, त्यानंतर त्याने तरूणींसमोर इम्प्रेशन मारायला सुरूवात केली. एका तरूणीला आणि तिच्या कुटुंबियांना त्याचे प्रोफाईल आवडले आणि तिने त्याच्याशी फोन नंबर एक्स्चेंज केल्यानंतर व्हाट्सअप आणि इंन्स्टाग्रामवर चॅटींग करायाला सुरूवात केली. तरूणीने सांगितले की विशालने त्याची महागडी कार दाखविली. तसेच संपत्ती म्हणून गुरूग्राममधील काही व्हीला आणि फार्म हाऊस दाखविले. तसेच फूड चेनमधला बिझनेसही दाखविला. यामुळे तरूणी इम्प्रेस होऊन त्याला भेटायला गेली. तरूणीच्या कुटुंबियांशी देखील विशालची मैत्री झाली.
आयफोन 14 प्रो स्वस्तात देतो सांगितले
विशालने या तरूणीला आयफोन 14 प्रो स्वस्तात मिळत असून आपण तो मिळवून देतो असे तिला सांगितले. या तरूणीने तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही आयफोन घेण्यासाठी तयार केले. या तरूणीने आठ ट्रांक्झशन मध्ये 3.05 लाख रूपये दिले. पैसे मिळाल्यानंतर त्याने त्या तरूणीला ब्लॉक केले. नंतर आपला अपघात झाला असून डॉक्टरांनी फोन घेण्यास मनाई केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तिची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तरूणी बनून त्याच्याशी मैत्रीचे नाटक केले. आणि त्याला अटक केले.