एका रसगुल्लाने घातला लग्नात गोंधळ, रंग बिघडला, मारामारी आणि दगडांचा पाऊस
लग्नसमारंभात खाद्यपदार्थ आणि डीजेवर नाचण्याच्या अनेक घटना घडतात. नुकतेच एका वराने आपल्या भावी पत्नीला जेवणात मासे शिजत नसल्याने थप्पड मारल्याचा प्रकार घडला. तर, आणखी एका लग्नात मोठा गोंधळ उडाला. रसगुल्ला हे गदारोळाचे मुख्य कारण ठरले.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नासाठी आलेल्या वधू पक्षामधील नातेवाईक यांच्यातील परस्पर वादामुळे मोठा वादंग झाला. त्यांच्यातील बाचाबाची इतकी वाढली की हाणामारीपर्यंत मजल गेली. हाणामारीवरून हे प्रकरण एकमेकांवर दगडफेक करण्यापर्यंत गेले. या घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. हे इतके मोठे प्रकरण घडण्यास एक रसगुल्ला कारणीभूत ठरला.
रसगुल्लावरून भांडण झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून लोकांशी बोलून घटनेमागचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना जी माहिती मिळाली ती ऐकून ते ही चकित झाले. हा वाद वधू किंवा वर यांच्या नातेवाईकांमध्ये झाला नाही. तर, वधूच्या परस्पर नातेवाईकांमध्ये झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
लग्नाला आलेल्या एक नातेवाईकाने जेवणादरम्यान दुसरा रसगुल्ला मागवला. या मुद्द्यावरून रसगुल्ला देणारा आणि नातेवाईक यांच्यात वादावादी झाली. वादानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. वधूच्या मामाने इतर काही नातेवाईकांना आणखी एक रसगुल्ला देण्यास नकार दिला. त्यावरून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. भडकलेल्या मामाने त्यांना शिवीगाळ करत एका नातेवाईकाला धक्का दिला. त्यामुळे हा वाद वाढून त्याचे पर्यावसान हाणामारीपर्यंत गेले. लग्नातील एका रसगुल्ल्याने संपूर्ण लग्नाचा रंगच बिघडला आणि लग्न मंडपातच मारामारी आणि दगडांचा पाऊस सुरू झाला.
नातेवाईकांची हाणामारी होत असताना काही जणांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात नातेवाईकांपैकी काहींनी मामाच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळले. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला जखमी झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सनोज प्रताप सिंग यांनी सांगितले की, याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. हाणामारीत जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर उपचार सुरू आहेत.