ती कामावरुन घरी आली अन् किंकाळी उडाली, महिलेसोबत नेमके काय घडले?
ती नोकरी करुन आजारी पती आणि दोन मुलांची जबाबदारी सांभाळत होती. नेहमीप्रमाणे कामावरुन रात्री घरी आली. त्यानंतर जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
कोटा : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिला नेहमीप्रमाणे कामावरुन घरी आली. यावेळी घरात लपलेल्या एका व्यक्तीने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरासह एका नातेवाईकालाही पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. सांगोड शहरातील तळवंडी भागात ही घटना आहे. भावना गौतम असे या महिलेचे नाव आहे. नरेंद्र गौतम असे हल्लेखोराचे नाव आहे. तो विवाहित असून, त्याला दोन मुलेही आहेत.
महिलेचा पती बऱ्याच कालावधीपासून आजारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नेहमी महिलेचा पाठलाग करायचा, तिच्या घरीही जायचे. महिला तिच्या दोन मुले आणि पतीसोबत राहत होती. महिलेच्या पतीला ब्रेन ट्युमरचा त्रास असल्याने, तो बराच काळापासून अंथरुणाला खिळला आहे. हल्लेखोर महिलेच्या घरात लपून बसला होता. मेडिकल स्टोअरमधून काम करून महिला रात्री उशिरा परतली असता, त्याने तिच्यावर हल्ला केला.
आरोपीला अटक
महिलेचा आरडाओरडा ऐकून घरातील इतर लोकही जागे झाले. कुटुंबीयांनी आरोपी नरेंद्र गौतमला तेथे रंगेहाथ पकडले. कुटुंबीयांनी या हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकरी गौतमला घरातून अटक केली. आरोपी नरेंद्र गौतम महिलेचा नेहमी पाठलाग करायचा. याबाबत महिलेने त्याला अनेक वेळा रोखलेही होते. तरीही तो ऐकत नव्हता. अखेर त्याने घरात घुसून महिलेची हत्या केली. या प्रकरणात मारेकऱ्याच्या नातेवाईकाचाही सहभाग होता. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाली की अन्य कारणातून याचा शोध आता पोलीस घेत आहेत.