Dombivali Crime : दूधाचा व्यवसाय सुरु केला, पण ग्राहकांपर्यंत पोहचायचे कसे या विवंचनेत होता, मग नामी शक्कल लढवली पण…
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी त्याने दूध विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मात्र ग्राहकांमपर्यंत दूध कसे पोहचवायचे हा प्रश्न होता. मग त्याने जे केले त्यानंतर तुरुंगच नशिबी आले.
डोंबिवली / 12 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत एक बाईक चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोराची चौकशी केली असता चोरीचे जे कारण समोर आले त्याने सर्वच हैराण झाले. एका दूध व्यावसायिकाने रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत एका दुचाकीची चोरी केली. दुचाकी मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रामनगर पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. गणेश म्हाडसे असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे. पोलीस चौकशीत चोराने बाईक चोरीचे जे कारण सांगितले त्याने पोलीस चक्रावले.
आरोपीचा दूध विक्रीचा व्यवसाय
आरोपी गणेश म्हाडसे हा मुरबाडमधील खापरी गावातील रहिवासी आहे. म्हाडसे दूध विक्रीचा व्यवसाय करतो. गावाजवळ असलेल्या शहरी भागात लोकांच्या घरी दूध टाकण्याचे काम म्हाडसे करतो. म्हाडसेकडे बाईक नसल्याने ग्राहकांपर्यंत दूध कसे पोहचवायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. म्हाडसेची घरची हलाखीची असल्याने बाईक घेणे त्याला परवडत नव्हते. यामुळे दुचाकी चोरीचा प्लान केला.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला अटक
चोरीच्या उद्देशाने त्याने डोंबिवली गाठली. मग डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत कॉलनी परिसरातून त्याने दुचाकी चोरली. दुचाकी घेऊन गावात परतला. दुचाकी मालकाच्या गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्याने रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सुनील कुराडे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी पथक नेमून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या. चोरट्याकडून चोरीला गेलेली बाईक पोलिसांनी हस्तगत केली आहे.