उधारी दिली नाही म्हणून मित्रांनीच अल्पवयीन मुलाला संपवले, वाचा नेमके काय घडले?
दोघा भावांकडून त्याने 18 हजार रुपये घेतले होते. पैसे परत मागितल्यास नेहमी टाळाटाळ करायचा आणि दोघा भावांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी द्यायचा. यामुळे आरोपींनी त्याच्या हत्येचा कट रचला.
दिल्ली : चार दिवसांपूर्वी आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा आज पोलिसांनी केला आहे. उधारी दिली नाही सात जणांनी मिळून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर तीन जण अद्याप फरार आहेत. मयत मुलाकडे आरोपींची 18 हजार रुपयांची उधारी होती. हे पैसे देण्यास मयत मुलगा टाळाटाळ करत होता. यामुळे संतापलेल्या आरोपींनी त्याला संपवण्याचा कट केला. आरोपींनी अन्य साथीदारांच्या मदतीने तरुणाचा काटा काढला.
दिल्लीतील शहाबाद डेअरी परिसरात 22 जानेवारी रोजी एका मुलाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरु केला.
असे उघडकीस आले प्रकरण?
तपासादरम्यान पोलिसांना 19 जानेवारी रोजी एक 14 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बेपत्ता मुलाच्या कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले असता तो मृतदेह त्यांच्याच मुलाचा होता.
नातेवाईकांनी सांगितले की 9 जानेवारी मुलगा बेपत्ता होता. बराच शोध घेऊनही तो सापडला नाही, मग 19 जानेवारी रोजी घरच्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळाली की मुलाचे शेवटचे लोकेशन डी ब्लॉक शाहबाद डेअरी येथे कपड्यांच्या दुकानाजवळ होती. या आधारे पोलिसांनी विक्रम आणि हर्षित या दोघा भावांना ताब्यात घेतले.
मयत मुलगा आरोपींच्या दुकानात उधारीवर कपडे खरेदी करायचा
चौकशीत आरोपींचे कपड्यांचे दुकान असून, मयत मुलगा नेहमी त्यांच्या दुकानातून कपडे खरेदी करायचा आणि पैसे द्यायचा नाही. तसेच पैसेही उधार घ्यायचा, असे पोलिसांना कळले.
दोघा भावांकडून त्याने 18 हजार रुपये घेतले होते. पैसे परत मागितल्यास नेहमी टाळाटाळ करायचा आणि दोघा भावांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी द्यायचा. यामुळे आरोपींनी त्याच्या हत्येचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे आरोपींनी मुलाल आपल्या दुकानात बोलावले. मग त्याच्या उधारीचे पैसे मागितले, पण मयत मुलाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्यात भांडण सुरु झाले. यादरम्यान आरोपींच्या अन्य साथीदाराने मुलावर गोळी झाडली. हत्या केल्यानंतर मृतदेह ई ब्लॉकमधील गटारात फेकला.