Thane Theft : वाढदिवस सेलिब्रेशनसाठी स्वतःच्याच घरी केली चोरी, मग पैशासाठी धमकी आल्याचा बनाव; काय घडले नेमके?
घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आले. यानंतर मुलीच्या वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
ठाणे : मौजमजा आणि हौस पूर्ण करण्यासाठी हल्लीची पिढी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. या हौसे-मौजेपायी तरुण पिढी गुन्हेगारी मार्गाला लागल्याचे चित्र पहायला मिळते. अशीच एक धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची घटना ठाण्यात घडली आहे. कापूरबावडी पोलिसात चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी सत्य उघड केलेच.
काय आहे नेमके प्रकरण?
ठाण्यातील कापूरबावडी परिसरात एका अल्पवयीन मुलीने वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतःच्याच घरातील दागिने चोरले. चोरलेले दागिने तिने आपल्या मित्राकडे दिले. मित्राने हे दागिने विकले आणि आलेल्या पैशात दोघांनी वाढदिवस साजरा केला.
दरम्यान, घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आले. यानंतर मुलीच्या वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. मिळालेल्या तक्रारीनुसार कापूरबावडी पोलिसांनी चोरीचा तपास सुरु केला.
तपासादरम्यान मुलीने घरच्यांची आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. एका मुलाने आपले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आपल्याकडे पैशाची मागणी केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
यानंतर पोलिसांनी तिने सांगितल्याप्रमाणे संबंधित तरुणाला ताब्यात घेत तपास सुरु केला. पण तपासात काहीच सापडले नाही. मग पुन्हा पोलिसांनी मुलीकडे कसून चौकशी केली असता मुलीचे अखेर गुन्ह्याची कबुल दिली.
मुलीने गुन्ह्याची कबुली देताच आरोपीला पोलिसांकडून अटक
आपणच वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातील दागिने चोरले आणि आपल्या मित्राकडे दिले. त्यानंतर मित्राने दागिने विकून पैसे आणले आणि आपण वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. यानंतर कापूरबावडी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
पालक आणि मुलांमधील कमी होत चाललेले संभाषण आणि मुलांवरील प्रेमापोटी त्यांच्यावर कमी होत चाललेले लक्ष या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरत असते. यामुळे पालकांनी आपली मुलं काय करतात याकडे लक्ष ठेवावे असे आवाहन पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी केले.