मद्यधुंद अवस्थेतील इसमाने एअर हॉस्टेसची काढली छेड, फ्लाइटमध्येही केला हंगामा
अटक करण्यात आलेली व्यक्ती पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी आहे. विमान अमृतसर विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी प्रवाशाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी दारूच्या नशेत होता आणि त्याने एअर होस्टेसचा विनयभंगही केला.
अमृतसर : गेल्या काही वर्षांत विमान प्रवासादरम्यान क्रू मेंबर्स आणि प्रवाशांमध्ये हाणामारी आणि मारामारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक मद्यधुंद प्रवाशांनी एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्ससोबत मारामारी केल्याचेही अनेकदा घडले आहे. आता असेच आणखी एक प्रकरण दुबई-अमृतसर विमानात समोर आले आहे. दुबईहून अमृतसरला जाणाऱ्या विमानात एअरहोस्टेसचा विनयभंग केल्याप्रकरणी एका मद्यधुंद व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पंजाबमधील जालंधरमधील कोटली गावातील रहिवासी राजिंदर सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शनिवारी विमान प्रवासादरम्यान राजिंदर सिंगचा एअर होस्टेससोबत जोरदार वाद झाला आणि त्याने तिचा विनयभंगही केला. एअर होस्टेसने या घटनेची माहिती क्रूला दिली. घटनेच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता.
विमान अमृतसरला पोहोचल्यानंतर क्रू मेंबर्सनी अमृतसर कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली. त्यानंतर विमान कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर विमान श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, राजिंदर सिंग यांच्याविरुद्ध कलम 354 आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.