लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाकडून आरोपीला अटक
आरोपी महिलांकडून 18 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेला हवालदार कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
टिटवाळा / सुनील जाधव : आरोपींवर कारवाई न करण्यासाठी 18 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालादाराला रंगेहाथ अटक केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. धनंजय लक्ष्मण फर्डे असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. फर्डे हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता. महिलेच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून हवालदाराला पकडले. सदरील कारवाईमुळे पोलीस स्टेशनमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून, परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आरोपींवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
तक्रारदार महिला आणि अन्य दोन महिला यांच्यामध्ये काही वाद झाला होता. याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. आरोपी महिलांविरोधात कुठलीही कारवाई न करण्यासाठी हवालदार फर्डे याने तिघी महिलांकडे प्रत्येकी 8 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती प्रत्येकी 6 हजार रुपये असे एकूण 18 हजार रुपये देण्याचे ठरले.
लाच स्वीकारताना हवालदाराला रंगेहाथ पकडले
याबाबत फिर्यादी महिलेने ठाणे लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून 18 हजाराची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ पकडले. ठाणे लाच लुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वीज मिटर लाऊन देण्यासाठी शेतकऱ्याकडे लाच मागितली
शेतामध्ये कॅनलवरुन ओलितासाठी पाणी घेण्याकरीता लवकर वीज मीटर लावून देण्यासाठी शेतकऱ्याला लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला एसीबीने ताब्यात घेतलं. ही कारवाई अडेगाव वीज वितरण केंद्रात करण्यात आली. कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे यास एक हजार रुपये लाच घेताना एसीबीने रांगेहाथ पकडले. याप्रकरणी देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.