सोलापूरमध्ये पोलीस ठाण्यातच पोलिसाने स्वत:वर गोळी झाडली, कारण अद्याप अस्पष्ट
वरिष्ठ अधिकारी दौंडला कोर्ट कामासाठी गेले होते. यावेळी पिंजारी पोलीस ठाण्यात एकटेच होते लोहमार्ग पोलीस ठाण्यात अधिकारी आणि नागरिक पोलीस ठाण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
सोलापूर : कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने ऑन ड्युटी असतानाच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वरिष्ठ अधिकारी कोर्टात कामासाठी गेले असताना अधिकाऱ्याने हे कृत्य केले. एच. डी. पिंजार असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस ठाण्यातच पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील घटना
सोलापूर जिल्हातील कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घटना घडली. पोलीस ठाण्यात ऑन ड्युटी काम करत असताना पिंजारी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर घटना उघड
वरिष्ठ अधिकारी दौंडला कोर्ट कामासाठी गेले होते. यावेळी पिंजारी पोलीस ठाण्यात एकटेच होते लोहमार्ग पोलीस ठाण्यात अधिकारी आणि नागरिक पोलीस ठाण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
टेबलवर काम करत असताना गोळी झाडून घेतली
टेबलवर काम करत असतानाच पिंजारी यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या. लोहमार्ग पोलीस ठाण्यातच फायरिंग झाल्याने मोठी खळबळ उडाली. पिंजारी यांचा मृतदेह कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
लोहमार्ग विभागातील वरिष्ठ विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पिंजारी यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
धुळ्यातही पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
पोलीस प्रशिक्षण केंद्रातच पोलीस निरीक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी घडली. प्रविण कदम असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
कदम यांनी सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये, असे म्हटले होते. कदम यांनी आत्महत्या नक्की कोणत्या कारणातून केली याबाबत धुळे शहर पोलीस तपास करत आहे.