ड्युटीवर असलेल्या पोलिसाची नियत फिरली; नको ती चूक करुन बसला आणि…
आरोपींच्या हातात बेड्या ठोकण्याचे काम पोलिस करतात. मात्र, पोलिसालाच बेड्या ठोकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्हयात घडला आहे.
भंडारा : चोरट्यांना कायद्याचा धडा शिकवणारी यंत्रणा म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. चोरी करणाऱ्यांचा हातात बेड्या ठोकण्याचे काम पोलिस करतात. मात्र, पोलिसालाच बेड्या ठोकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्हयात घडला आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिसाची नियत फिरली आणि त्याच्या हातातून मोठी चूक झाली. पोलिस विभागात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने रिव्हॉल्वर आणि काडतूस चोरली. या प्रकरणी पोलिस शिपायाला अटक झाली आहे.
शनिवारी घडलेली ही घटना आजा उघडकीस आली आहे. निलेश खडसे असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खडसे याच्या विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी पोलीस कर्मचारी हा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल व हिफाजत कक्षात तैनात होता. सहायक फौजदार सुनील सायम यांच्या नावाने असलेली 0.38 शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 9 MM चे 35 काडतूस त्याने शनिवारी चोरुन नेले.
दरम्यान, रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरी गेल्याची माहिती समोर आल्याने भंडारा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर पोलिसांनी उलट सुलट तपास करत सीसीटिव्ही फुटेज तपासले.
यानंतर नीलेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरल्याची कबुली दिली आहे. निलेशला अटक करत त्याच्याकडून रिव्हॉल्वर व 35 काडतूस पोलिसांनी जप्त केल्या आहेत.