सहा वर्षाचा मोनू वरात पहायला घराबाहेर गेला, पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं
भूमाफियांनी अनधिकृतरित्या हरिनगर कॉलनी निर्माण केली आहे. त्यामुळे येथे सुविधांची वाणवा आहे. येथे पाणी, वीज, रस्ते आदि कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.
पानीपत : शेजारी आलेली वरात पाहण्यासाठी गेलेल्या सहा वर्षाच्या चिमुरड्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हरियाणातील पानीपतमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोनू असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव असून, तो इयत्ता पहिलीत शिकत होता. वीजेच्या तारांसाठी लावलेल्या अनधिकृत लोखंडाच्या पाईपला शॉक लागून मोनूचा मृत्यू झाला आहे.
मोनूच्या मृत्यूनंतर वीज वितरण विभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून, अनधिकृत पाईप लावणाऱ्या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याची शिफारस करणार आहे. सध्या असे अनधिकृत पाईप लावणाऱ्या आणि हायव्होल्टेज तारांखाली घर बांधणाऱ्या लोकांना वीज कंपनीने नोटीस पाठवली आहे.
काय आहे घडले नेमके?
पानीपतमधील हरिनगर परिसरात राहणारा मोनू शेजारी आलेली वरात पाहण्यासाठी घराबाहेर गेला. यावेळी परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या वीजेच्या पाईपच्या संपर्कात आल्याने त्याला वीजेचा शॉक बसला.
वीजेचा शॉक बसताच मोनू पाईपला चिकटला आणि बराच वेळा तडफडत होता. काही वेळाने परिसरातील एक महिला काही कामानिमित्त घराबाहेर आली. तिचे लक्ष मोनूकडे गेले. तिने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे गोळा झाले.
लोकांनी मोनूची सुटका करत त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनधिकृत आहे कॉलनी
भूमाफियांनी अनधिकृतरित्या हरिनगर कॉलनी निर्माण केली आहे. त्यामुळे येथे सुविधांची वाणवा आहे. येथे पाणी, वीज, रस्ते आदि कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. वीजेसाठी लोखंडी पाईपवर तारा लटकत आहेत.