भरधाव ट्रॉलीने कारला फरफटत नेले, भीषण अपघातात अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू
गौसगंज येथील रहिवासी सौरभ अग्रवाल, त्यांची पत्नी रागिणी, आई आशा अग्रवाल आणि सौरभ यांचा अडीच वर्षांचा मुलगा यांच्यासह वॅगनआर कारमधून कानपूरच्या दिशेने जात होते.
कानपूर : भरधाव ट्रॉलीने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक देत फरफटत नेल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. या भीषण अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॉलीचा वेग इतका होता की कारला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेले विटांचे घर तोडून ट्रॉली मोठ्या नाल्यात अडकली.
मुगल रोडवर घडली घटना
कानपूर ग्रामीण भागातील मुसानगर पोलीस स्टेशन हद्दीतील मुगल रोडवर असलेल्या बीआरडी डिग्री कॉलेजजवळ बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळाहून ट्रॉली ताब्यात घेतली आहे.
अपघातात कारचा चक्काचूर
अपघातात कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गॅस कटरने कार कापून जखमींना बाहेर काढले. अपघातानंतर ट्रॉली चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी ट्रॉली चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेत आहेत.
कानपूरच्या दिशेने जात होते अग्रवाल कुटुंबीय
गौसगंज येथील रहिवासी सौरभ अग्रवाल, त्यांची पत्नी रागिणी, आई आशा अग्रवाल आणि सौरभ यांचा अडीच वर्षांचा मुलगा यांच्यासह वॅगनआर कारमधून कानपूरच्या दिशेने जात होते.
समोरुन येणाऱ्या अनियंत्रित ट्रॉलीने कारला दिली धडक
यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलीने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यानंतर काही अंतरापर्यंत कार फरफटत नेली. ट्रॉलीचा वेग अधिक असल्याने अनियंत्रित झाली आणि कारला धडकली. कारला फरफटत नेल्यानंतर ट्रॉली रस्त्याच्या कडेला असलेल्या घराला धडकून नाल्यात पडली.