मित्र म्हणाले हा मुलगा मोठा होऊन तुझी हत्या करेल, हे ऐकून पित्याने केले असे काही…
आरोपीच्या पहिल्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. तर दुसरा विवाह दीड महिन्यापूर्वीच केला होता. पीडित महिलेने आपल्या पहिल्या पतीला सोडून आरोपीशी लग्न केले होते.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील शिवपुरी (Shivpuri Madhya Pradesh) येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. सावत्र बापाने अडीच वर्षाच्या मुलाची हत्या (Child Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह एका लोखंडाच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला. हत्येनंतर आरोपी फरार (Accuse Absconding) झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लखन कुचबुंदिया असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी बालकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
मित्रांनी भडकवल्यामुळे मुलाची हत्या
हा मुलगा मोठा झाल्यावर तुझी हत्या करेल असे मित्रांनी सांगितल्यामुळे आरोपीने सावत्र मुलाचा काटा काढला. आरोपी लखन हा हिस्ट्रीशीटर आहे. कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत मनियार परिसरात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.
हत्येसमयी आरोपीने पत्नीला एका खोलीत बंद केले. त्यानंतर मुलाला संपवले. लाचार पत्नी मुलाच्या जीवासाठी टाहो फोडत होती. मात्र निर्दयी पित्याला जराही दया आली नाही.
दीड महिन्यापूर्वीच महिलेने आरोपीशी केला होता विवाह
आरोपीला दोन बायका असून, दोघीही त्याच्यासोबतच राहतात. आरोपीच्या पहिल्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. तर दुसरा विवाह दीड महिन्यापूर्वीच केला होता. पीडित महिलेने आपल्या पहिल्या पतीला सोडून आरोपीशी लग्न केले होते. महिलेला पहिल्या पतीपासून अडीच वर्षाचा मुलगा होता.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधीच पोलिसांनी केले अटक
मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह एका बॉक्समध्ये भरुन ठेवला. आरोपी रात्रीच्या सुमारास मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता. मात्र दोघी पत्नींच्या आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले आणि आरोपीचा प्लान फसला.
पोलीस आल्याचे पाहताच आरोपी तेथून फरार झाला. पोलिसांनी बॉक्समधून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवत आरोपीचा शोध सुरु केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.