शिक्षिका की हैवान? दोन शिक्षिकांचा वाद झाला, रागाच्या भरात निष्पाप शाळकरी मुलीसोबत केले तालिबानी कृत्य
शिक्षिकेविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. महिलांपाठोपाठ आता लहान मुलांच्या विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजधानीतील एका शाळेमध्ये घडलेल्या घटनेने शिक्षिकेमधील राक्षसी प्रवृत्तीचे दर्शन झाले आहे. प्राथमिक शाळेमध्ये दोन शिक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कालांतराने त्या बाचाबाचीमध्ये एका पाचवी येथे शिकणाऱ्या मुलीला पेपर कटरच्या सहाय्याने मारण्यात आले. एवढेच नव्हे तर नंतर त्या मुलीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले.
मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर हिंदुराव रुग्णालयामध्ये अधिक उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. जखमी मुलीची मृत्यूची झुंज सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेबाबत परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन शिक्षकांच्या भांडणात मुलीच्या जीवाशी खेळ
दिल्ली नगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. शाळेच्या आवारात दोन शिक्षकांमध्ये जोरदार भांडण झाले होते. या भांडणामध्ये एका निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळ खेळण्यात आला.
शाळकरी मुलीला इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खाली फेकण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीला इमारतीवरून खाली फेकण्याआधी तिला पेपर कटरच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली होती.
फिल्मीस्थानच्या मॉडलबस्ती प्राथमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गीता देशवाल असे शाळकरी मुलीला इमारतीवरून खाली फेकणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. पोलिसांनी या शिक्षिकेला ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू आहे.
शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपी गीता देशवाल या शिक्षिकेने शाळकरी मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्या आधारे शिक्षिकेविरुद्ध पुढील कारवाई केली जाणार आहे.