घराबाहेर खेळता खेळता अचानक चिमुरडी गायब झाली, मग जे समोर आलं त्याने पायाखालची जमीनच सरकली !
घराबाहेर खेळत असलेली दोन वर्षाची चिमुरजी अचानक गायब झाली. पोलिसांसह सर्वच जण तिचा शोध घेत होते, पण तिचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. एक दिवस अचानक जे समोर आलं ते फार धक्कादायक होते.
ग्रेटर नोएडा : पैशासाठी माणूस काय करेल याचा नेम नाही. पैशासाठी माणसाला नात्याचाही विसर पडतो. अनेकदा जवळचे लोकच आपल्याला अधिक धोका देतात. अशीच एक घटना ग्रेटर नोएडामध्ये उघडकीस आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुरडीची हत्या करणारा दुसरा तिसरा कुणी नसून, तिचाच शेजारी आहे. मुलीच्या शेजारील घरामध्ये तो राहत होता आणि पीडित कुटुंबाशी त्याचे अत्यंत जवळचे संबंध होते. चिमुरडीचे अपहरण करून तिच्या कुटुंबीयांकडे दोन लाखांची खंडणी मागण्याचा कट आरोपीने रचला होता. मात्र मुलीने आरडाओरडा केल्यास संपूर्ण मेहनतीवर पाणी पडेल, या भीतीने आरोपीने थेट तिची हत्याच केली.
घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली चिमुरडी
चिमुरडीची हत्या केल्यानंतर चिमुरडीचा मृतदेह बॅगमध्ये ठेवून बॅग घरातील खुंटीवर टांगून ठेवली. मात्र त्यानंतर चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्यामुळे परिसरात शोधाशोध सुरू होती. आपल्यावर कुणी संशय घेऊ नये म्हणून आरोपी हा चिमुरडीच्या कुटुंबीयांसोबत इकडे तिकडे शोध घेत होता. राघवेंद्र असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बलिया येथील रहिवासी आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शेजारच्या घरातून वास आला अन् घटना उघड झाली
चिमुरडीचा शोध सुरु असतानाच अचानक राघवेंद्रच्या खोलीतून घाणेरडा वास येऊ लागला. लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ राघवेंद्रच्या घराजवळ दाखल होत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत जाऊन पाहतात तर पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. आरोपीच्या घरात खुंटीला टांगलेल्या बॅगेत बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह होता.
आरोपीला अटक
घटना उघड होताच आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांनी तात्काळ वेगाने तपासचक्रे फिरवत राघवेंद्रला गाझियाबाद रेल्वे स्थानकातून अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत, पैशासाठी आपण हे कृत्य केल्याचे सांगितले.