दोघात तिसरा आला अन् संसाराचा खेळखंडोबा झाला, मग जे घडले ते खूपच भयंकर
तिचा दुसऱ्यावर जीव जडला. मग तिला पतीचा अडसर वाटू लागला. तिला आपले प्रेम मिळवायचे होते. पण पती हयात असताना ते शक्य नव्हते. मग तिने नियोजित पद्धतीने एक प्लान आखला.
इंदूर : विवाहबाह्य प्रेमसंबंध रक्तरंजित स्वरूप घेऊ लागले आहेत. प्रेमाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराचा काटा काढण्याचे कारस्थान रचल्याच्या घटना हल्ली उघडकीस येत आहेत. महिलाही अशा गुन्हेगारी कारस्थानमध्ये सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये घडलेल्या हत्याकांडात महिलेने भयानक पद्धतीने पतीच्या हत्येचा कट रचला. विवाहबाह्य संबंधांमध्ये पती अडथळा ठरत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने प्रियकराच्या साथीने पतीला जीवे मारले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने महिला आणि तिच्या प्रियकरासह आणखी एका तरुणाला अटक केली आहे. तिन्ही आरोपींची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे.
तरुण मागील आठवडाभरापासून होता बेपत्ता
मयत तरुण आठवडाभरापासून बेपत्ता होता. जावेद असे या तरुणाचे नाव आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार 22 एप्रिल रोजी चंदननगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. नंतर त्याची हत्या झाल्याचे उघडकीस येताच कुटुंबीय तसेच नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. जावेदच्या कुटुंबीयांनी सद्दाम नावाच्या तरुणावर संशय घेतला होता. त्या संशयाच्या आधारे पोलिसांनी सद्दामला ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी करण्यात आली.
सुरुवातीला तो पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणे टाळत होता. तसेच दिशाभूल करणारी उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी आपल्या खाकीचा इंगा दाखवताच सद्दामच्या तोंडून घटनेचा उलगडा झाला. याचवेळी त्याने जावेदची हत्या करण्यात आल्याची कबुली दिली.
पत्नीच्या मदतीने पतीची हत्या
विशेष म्हणजे हा कट जावेदच्या पत्नीच्या मदतीनेच आखण्यात आल्याचे सद्दामने आपल्या जबाबात सांगितले. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जावेदच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्यावेळी तिने विवाहबाह्य संबंधात पतीचा अडथळा येत होता, म्हणून त्याला जीवे मारल्याचे कबूल केले. पोलिसांनी सद्दामसह शाकीर आणि जावेदची पत्नी रुकसाना या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवला.
आधी दारु पाजली मग हत्या केली
सद्दाम आणि रुकसाना या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते. हे दोघे एकाच कॉलनीमध्ये राहत होते. सद्दाम हा रिक्षा चालवायचा. त्याचे रुकसानावर प्रेम जडले होते. रुकसाना हिच्या सांगण्यावरून त्याने जावेदला दारू पिण्यासाठी बोलावले आणि जावेदला दारूची नशा चढल्यानंतर त्याची रिक्षामध्येच हत्या करण्यात आली. त्यानंतर जावेदचा मृतदेह एका मोकळ्या मैदानात फेकून देण्यात आला होता.