दारुपार्टी केल्यानंतर पतीचा काटा काढला, आरडाओरडा करत कांगावा केला; पण पोलिसांनी अखेर हेरलेच
जेवण तसेच दारू पिऊन झाल्यानंतर विनय आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. याच वादाचा राग मनात ठेवत आरोपी महिलेने काही क्षणांतच पतीच्या हत्येचा कट रचला.
बाराबंकी : मद्यपी पतीच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी महिलेने पतीच्या हत्याकांडाचे धाडस केले. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पती दारूच्या नशेत धुंद असल्याचे पाहून महिलेने त्याची राहत्या घरातच हत्या केली. त्यानंतर स्वतःचा कारनामा लपवण्यासाठी ती जोरजोरात ओरडत घराबाहेर आली आणि पतीला काही मारेकऱ्यांनी मारून पलायन केले, असा खोटा दावा केला. पण महिलेच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग पोलिसांना दिसले आणि महिलेचे क्रूर कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीचा इंगा दाखवताच महिलेने स्वतःच पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या धक्कादायक घटनेने बाराबंकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरामध्ये दारूची पार्टी झाल्यानंतर तिने पतीचा कायमचा काटा काढला. या घटनेने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे.
घरामध्ये नातेवाईकांसोबत आयोजित केली होती दारूची पार्टी
बाराबंकीच्या थाना पिरपूर परिसरातील रहिवाशी असलेल्या 28 वर्षीय विनय राज याची त्याच्या पत्नीने हत्या केली. ही घटना घडण्यापूर्वी विनयने त्याच्या नातेवाईकांना आपल्या घरी बोलावले होते. नातेवाईकांसोबत दारूची पार्टी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जेवण तसेच दारू पिऊन झाल्यानंतर विनय आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. याच वादाचा राग मनात ठेवत आरोपी महिलेने काही क्षणांतच पतीच्या हत्येचा कट रचला.
पती दारुच्या नशेत असताना केला वार
विनय दारूच्या नशेत धुंद झाल्याचे लक्षात येताच पत्नी राधा हिने विनयच्या डोक्यात जीवघेणा वार केला. या हल्ल्यात विनयचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हादरून गेलेल्या राधाने स्वतःचा पुन्हा लपवण्यासाठी खोटी आरडाओरड सुरू केली.
अज्ञात आरोपींनी हत्या केल्याचा कांगावा केला
पतीला मारण्यासाठी काही लोक घरी आले आणि त्यांनी हत्या करून पळ काढला, असा दावा तिने शेजारच्यांपुढे केला. या घटनेची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना राधा हिच्या बोलण्यावर संशय आला.
‘असा’ झाला खुलासा
राधा हिने आपण टॉयलेटमध्ये असताना काही लोक घरामध्ये शिरले आणि त्यांनी पतीची हत्या केली, असा दावा केला. पण राधा हिचा कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्यामुळे पोलिसांचा राधा हिच्यावरील संशय आणखी वाढला.
अखेर अधिक चौकशीदरम्यान राधाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी विनयच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राधा हिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.