खोकल्याचे औषध असल्याचे सांगत मुलींसह विष प्राशन केले, तीन मुलींच्या आईने असे का केले?
झोपण्यापूर्वी तिने दोन मुलींना खोकल्याचे औषध असल्याचे सांगत विषारी औषध पाजले. तिसऱ्या मुलीने औषध पिण्यास नकार दिल्याने ती बचावली आहे. दोन मुलींना औषध पाजल्यानंतर तिने स्वतःही औषध प्राशन केले आणि सर्व जण झोपले.
मथुरा : कौटुंबिक कलहाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलींसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे उघडकीस आली. यात आई आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिसऱ्या मुलीने औषध न घेतल्याने ती यातून बचावली आहे. नीरज देवी उदयवीर सिंह असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पतीसोबत वाद झाला होता
मथुरातील मगोर्रा पोलीस ठाण्याअंतर्गत सौंख गावात नीरज देवी पती आणि तीन मुलींसह राहत होती. सोमवारी रात्री नीरज देवीचा तिच्या पतीसोबत वाद झाला. यानंतर सर्व जण झोपायला गेले.
खोकल्याचे औषध सांगून मुलींना विष पाजले
झोपण्यापूर्वी तिने दोन मुलींना खोकल्याचे औषध असल्याचे सांगत विषारी औषध पाजले. तिसऱ्या मुलीने औषध पिण्यास नकार दिल्याने ती बचावली आहे. दोन मुलींना औषध पाजल्यानंतर तिने स्वतःही औषध प्राशन केले आणि सर्व जण झोपले.
उपचारादरम्यान मायलेकीचा मृत्यू
रात्री नीरजला आणि दोन्ही मुलींना उलट्या सुरु झाल्या. यामुळे कुटुंबीयांना त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान पहाटे नीरज आणि एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.
मायेकीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. कुटुंबीयांचीही चौकशी सुरु आहे.