डोंबिवली / 7 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यात महिलाही मागे नाहीत. महिला चोरांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. कायम गर्दीने फुललेल्या डोंबिवली स्टेशन परिसरात महिला चोरांचा सुळसुळाट असल्याचे पहायला मिळते. गर्दीचा फायदा घेत एक महिला चोर इतर महिलांची पर्स कापत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिलांची बॅग कापायची आणि पर्समधील दागिने, पैसे चोरुन पसार व्हायची. पोलिसांनी या महिला चोराला अटक केली आहे. सुवर्णा गायकवाड असे सदर महिला चोराचे नाव आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्टेशन परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. विशेषतः महिलांची घरगुती सामान, भाजीपाला खरेदीसाठी गडबड सुरु असते. याच गर्दीचा फायदा घेत गायकवाड या महिलेने भाजीपाला खरेदी करत असलेल्या एका महिलेची पिशवी कापली. पिशवीतील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. याप्रकरणी पीडित महिलेने डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरु केला.
पोलिसांनी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता महिला चोरी करताना त्यात कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेचा शोध सुरु केला आणि अंबरनाथमधून महिलेला अटक केली. महिलेवर याआधीही चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. कल्याण झोन 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक बळवंत भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून महिलेचा शोध घेण्यात आला.