सिमकार्ड खरेदी करताना सावधान, अन्यथा तुम्हाला भोगावा लागेल तुरुंगवास, वाचा काय आहे प्रकरण?
बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्डची विक्री सुरु असल्याची माहिती डोंबिवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता धक्कादायक माहिती उघडकीस आली.
डोंबिवली : सिम कार्ड घोटाळ्याची एक धक्कादायक घटना डोंबिवली येथे उघडकीस आली आहे. ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत सिम कार्डची विक्री सुरु होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात कलम 406, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत डोंबिवलीतील महिलेला अटक केली आहे. हर्षदा सुरेश पराडकर असे सदर महिलेचे नाव आहे. पोलीस महिलेची अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दुकानात धाड टाकत केली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस डोंबिवली पूर्वेतील गणेश इलेक्ट्रिक शॉपमध्ये दाखल झाले. दुकानात चौकशी केली असता आपण 2021 पासून प्रमोटर म्हणून काम करत असल्याचे महिलेने सांगितले. नमूद मोबाईल आपला असून, आपणच वोडाफोन-आयडियाचे सिमकार्ड वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता, सदर मोबाईल आढळून आला. पंचांच्या साक्षीने पंचनामा करत महिलेची अधिक चौकशी करण्यात आली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे 170 सिमकार्ड दिल्याचे निष्पन्न
वेगवेगळे फोटो ग्राहकांच्या आधारकार्डवर वापरुन बनावट आधारकार्ड तयार करायची. मग बनावट आधारकार्डच्या आधारे नवीन सिमकार्ड अॅक्टिव्ह करत विक्री करायची, असे महिलेने पोलीस चौकशीत सांगितले. महिलेने 2021 पासून आतापर्यंत प्रमोटर डेमो आयडीचा वापर करत सिम कार्ड घेणाऱ्या नागरिकांच्या दस्तऐवजीवर वेगवेगळ्या फोटो लावत, 170 जणांच्या नावावर सिम कार्ड काढून विक्री केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी सपोनि भराडे, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय तारमळे, एपीआय भराडे आणि पीएसआय सुनील पाटील यांच्या टीमने ही कामगिरी केली.
954112