ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवत महिलेची लाखोंची लूट, काय आहे मोडस ऑपरेंडी?
एक महिला ऑनलाईन नोकरी शोधत होती. तिने इंटरनेटवर जॉब सर्च केला. दुसऱ्या दिवशी महिलेला एका कंपनीकडून ऑफर आली. महिलेने ती ऑफर स्वीकारली. पण नंतर पश्चातापाची वेळ आली.
मुंबई : ऑनलाईन नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेला 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना मुंबईतील वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. राजश्री संखे असे फसवणूक झालेल्या 48 वर्षीय महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. महिलेला हॉटेलचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू लिहून पैसे कमविण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर महिलेला मोठ्या टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महिलेने पैसे गुंतवले.
इंटरनेटवर जॉब सर्च करत होती महिला
वांद्रे येथे राहणाऱ्या राजश्री संखे या नवीन नोकरीसाठी इंटरनेट ब्राउझ करत होती. दुसर्या दिवशी, त्यांना अमोली नामक महिलेचा मॅसेज आला. अमोलीने स्वतःची टार्गेट-जी कंपनीची एचआर म्हणून ओळख सांगितली. अमोलीने तक्रारदाराला त्वरीत पैसे मिळवण्याची ऑफर संखे यांनी दिली. हॉटेलचा ऑनलाईन रिव्ह्यू करण्यासाठी 150 रुपये ऑफर केले. तिने सुरुवातीला केलेल्या कामाचा मोबदला देण्यात आला.
टास्क पूर्ण करण्यासाठी 10 लाख रुपये जमा करण्यास सांगितले
संखे हे काम पूर्ण करत राहिल्याने त्यांना दिलेल्या आयडीमध्ये पैसे जमा होत राहिले. त्यांनी कर्ज घेतले आणि टास्क मिळवण्यासाठी 9.95 लाख रुपये भरले. मात्र, रक्कम जमा केल्यानंतर त्यांना कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे संखे यांच्या लक्षात आले. यानंतर संखे यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिली. संखे यांच्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.