पती सोडून दुसऱ्या पुरुषावर जीव जडला, प्रियकाराने तिचाच काटा काढला
अनेक अपेक्षांचे ओझे डोक्यावर मारणाऱ्या महिलेपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी तिच्या प्रियकरानेच मित्राच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
लखनौ : विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) एका महिलेला चांगलेच महागात पडल्याचे उत्तर प्रदेशातील एका घटनेतून उघडकीस आले आहे. दुसऱ्या पुरुषावर महिलेचा जीव जडला म्हणून तिने नवऱ्याला सोडले. प्रियकरासोबत महिला लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत होती. प्रियकरासोबत ऐशोरामी जगेन, अशी आशा महिलेने बाळगली होती. यादरम्यान तिने प्रियकराकडे नवनव्या अपेक्षांचा पाढा वाचला होता. मात्र याच अपेक्षांमुळे तिला अखेर प्राण गमवावा लागला. प्रियकरानेच मित्राच्या मदतीने तिची निर्घृण हत्या (Women Killed by Boyfriend) केली आणि दगड बांधून मृतदेह नदीत फेकून दिला.
काही दिवसांपूर्वी नदीत आढळला होता मृतदेह
उत्तरप्रदेशातील कौशांबी परिसरात काही दिवसांपूर्वीच नदीत दगड बांधून फेकलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला होता.
अनेक अपेक्षांचे ओझे डोक्यावर मारणाऱ्या महिलेपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी तिच्या प्रियकरानेच मित्राच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 30 वर्षीय संजू देवी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
सासर सोडून माहेरी आली होती महिला
हत्या झालेल्या संजू देवीने पतीच्या कटकटीला कंटाळून सासर सोडले होते. ती सध्या माहेरी स्थायिक झाली होती. माहेरच्या परिसरातील प्रियकरासोबत ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पुढे या संबंधात प्राण गमवावा लागेल, याची तिला कधी कल्पनाही आली नसावी.
लिव्ह-इनमध्ये प्रियकराने तिला कुठलाही संशय येऊ न देता हत्येचा कट रचला होता. नदीत मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना दिली. त्यानुसार करारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली.
पुढील तपासादरम्यान पोलिसांना महिलेचा प्रियकर मुकेश याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. यावेळी त्याने हत्येच्या कटाची कबुली दिली. दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.