पुणे : तोरणागडा (Toranagad)वर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा चढाई करताना डोक्यावर दगड कोसळून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. गेल्या दोन दिवसातील तोरणागडावरील ही दुसरी घटना आहे. दोन्ही तरुण पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत होते. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तोरणागडावर चढाई करताना ओंकार महेशकुमार भरमगुंडे या तरुणाचा डोक्यात दगड कोसळून मृत्यू झाला. तर शनिवारी दुपारी गडावर चढाई करताना पाऊल वाटेवर अत्यवस्थ होऊन निरंजन नितीन धुत या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच दोन्ही घटनेत तरुणांना स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखलं केले. मात्र उपचाराआधीच दोघांचाही मृत्यू झाला. (A young man died when a stone fell on his head while climbing Tornagada in Velha)
ओंकार भरमगुंडे हा आपल्या मित्रांसोबत रविवारी सकाळी तोरणागडावर फिरण्यासाठी गेला होता. तोरणागडाच्या तटबंदी खाली बिन्नी दरवाजाच्या अखेरच्या टप्प्यावर सर्व जण रेलिंगच्या पायऱ्या चढत होते. त्यावेळी गडाच्या तटबंदीच्या बुरजावर माकडांची भांडणे सुरू होती. त्यावेळी एक मोठा दगड बुरजावरुन कोसळून ओंकार याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. तो जागीच निपचित पडला. घटनेची माहिती मिळताच गडावरील सुरक्षा रक्षक राजू बोराणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गडावर जाणारे कोल्हापूर येथील अभिजित पाटील हे गडावर न जाता थांबले. अभिजित यांनी गंभीर जखमी ओंकार याला आपल्या पाठीवर घेतले.
ओंकारच्या जखमांतून रक्तस्राव सुरू होता. त्याला तातडीने उपचार मिळावे यासाठी अभिजित न थांबता वेगाने पाऊल वाटेने गडाच्या पायथ्याकडे धावत होते. त्यांचे सहकारी अक्षय ओंबळे, गुणवंत सावळजाकर आदी मित्र ओंकारच्या मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते सुनिल राजिवडे हे पोलीस तसेच रुग्णवाहिका घेऊन गडाच्या पायथ्याच्या वाहनतळावर दाखल झाले. तेथून ओंकार याला वेल्हे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ओंकारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह मित्रांच्या ताब्यात देण्यात आला.
वारजे येथील निरंजन धुत हा महाविद्यालयीन तरुण शनिवारी सकाळी ओजस नेटके, ओंजस जाधव, विशाल दाणे आदी मित्रांसोबत तोरणागडावर फिरण्यासाठी गेला होता. गडाच्या पायथ्याच्या वाहतळावर मोटारसायकल उभ्या करुन सर्वजण गडाच्या पाऊलवाटेने चालले होते. दुपारी पायी मार्गावरील उंबराच्या झाडाजवळ निरंजनला अस्वस्थ वाटू लागले. उलटी होऊन त्याला घाम आला. मित्रांनी त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्याला बरे वाटत नव्हते म्हणून त्याने मित्रांना गड पाहण्यास जा असे सांगून तो गडावर न जाता पाउल मार्गावर थांबला. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निरंजन याने मित्रांना हात दाखवले. त्यानंतर निरंजन हा बेशुद्ध पडला. तेथून निरंजन याला उचलून मित्रांनी खाली आणले. वाहनतळावरील रुग्णवाहिकेतून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डाँक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (A young man died when a stone fell on his head while climbing Tornagada in Velha)
इतर बातम्या