मैत्रिणींसमोर शायनिंग मारणं अंगलट आलं, तरुणाची थेट पोलीस ठाण्यात रवानगी
आजकालचे तरुण मुलींवर इम्प्रेशन पाडण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. यानंतर तरुणाची तुरुंगात रवानगी झाली आहे.
सातारा : साताऱ्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ मजा म्हणून केलेला उद्योग एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. मैत्रिणींसमोर शायनिंग मारण्यासाठी तरुणाने जमिनीवर गोळीबार केला. पण काही वेळातच ही शायनिंग भारी पडली आणि तरुणाची थेट तुरुंगात रवानगी झाली. सातारा शहर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. नेताजी बोकेफोडे असे अटक तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तुलही जप्त केली आहे. तरुण आणि दोघी तरुणी डॉक्टरकडे आल्या होत्या. डॉक्टरच्या क्लिनिकमध्येच ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
काया आहे प्रकरण?
संबंधित तरुण आणि त्याच्या दोन मैत्रिणी एमआयडीसीतील समर्थ कॉलनी परिसरात गणेश क्लिनिकमध्ये आलो होत्या. तरुणाच्या एका मैत्रिणीला डॉक्टरांकडे तपासायचे होते. मात्र डॉक्टर आले नसल्याने त्यांना थांबालयाल सांगण्यात आले. तिघेही डॉक्टरांची वाट पाहत बाहेर थांबले होते. इतक्यात तरुणाने स्वतःकडील पिस्तुल काढली आणि मैत्रिणींवर इम्प्रेशन मारण्यासाठी जमिनीवर फायरिंग केली. यानंतर दोघीही तरुणी खूप घाबरल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मग तिघेही डॉक्टरला न भेटता स्कूटीवरुन निघून गेले.
सीसीटीव्हीच्या मदतीने तरुणाला अटक
यानंतर नागरिकांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीतील स्कुटीच्या नंबरवरुन पोलिसांनी तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडील पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत तरुणाची चौकशी केली असता केवळ मजेत आपण फायरिंग केल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. मात्र तरुणाकडे पिस्तुल कुठून आली?, तो ही पिस्तुल का बाळगतो? याबाबत पोलीस तपास करत आहेत.