व्यावसायिक वादातून अंधेरीत एकावर जीवघेणा हल्ला, तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जोगेश्वरी पश्चिमेला ओशिवरा येथे राहणारा प्रवीण बागडी याचा आरोपीसोबत व्यावसायिक वाद होता. याच वादातून आरोपींनी नियोजन करत वीरा देसाई रोडवरील ओबेरॉय इमारतीजवळ प्रवीणवर तलवारीने हल्ला केला.
मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : व्यावसायिक वाद आणि सामाजिक कार्याचा राग मनात धरुन एका तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. प्रवीण राजपाल बागडी असे मारहाण करण्यात आलेल्या 32 तरुणाचे नाव आहे. तर प्रतीक पारसलाल गुप्ता, रियाज फुरकाने अन्सारी आणि विघ्नेश बतुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात कलम 307, 323, 504, 506(2), 120B, 34 भादवि सह 4, 25 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक वादातून नियोजित कट
जोगेश्वरी पश्चिमेला ओशिवरा येथे राहणारा प्रवीण बागडी याचा आरोपीसोबत व्यावसायिक वाद होता. याच वादातून आरोपींनी नियोजन करत वीरा देसाई रोडवरील ओबेरॉय इमारतीजवळ प्रवीणवर तलवारीने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
आंबोली पोलिसांकडून आरोपींना अटक
याप्रकरणी प्रवीण बागडी याने आंबोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल करत तिघांना अटक केली आहे. पीडत तरुण आणि आरोपींमध्ये नेमका काय वाद होता, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.