गोंदिया / शाहिद पठाण : तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदियातील कारुटोला येथे घडली आहे. रंजित देवचंद रहांगडाले असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बचाव पथकाने 24 तास शोध घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली. तलावाजवळ पडलेल्या कपडे, मोबाईल आणि सायकलीवरुन तरुणाची ओळख पटवण्यात आली.
गुरे चरण्यासाठी मंगळवारी दुपारी काही गावकरी गेले होते. यावेळी कारुटोला येथील पांढरा तलावाच्या किनाऱ्याजवळ कपडे, मोबाईल आणि सायकल गावकऱ्यांना दिसली. मात्र कुणीही तलावात अंघोळ करत दिसत नसल्याने लोकांनी गावात याची माहिती दिली. मात्र गावातील लहान मुलांनी रंजित रहांगडाले याला तलावाकडे जाताना पाहिले. तसेच कपडे आणि सायकलवरुन रंजित बुडाला असावा, असा अंदाज लावण्यात आला.
यानंतर सालेकसा पोलीस आणि बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत तलावात शोध मोहिम सुरु केली. तब्बल 24 तास शोधमोहिम राबवून तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.