अंबरनाथमध्ये रेल्वे अपघातातील ‘त्या’ जखमी तरुणीचा मृत्यू, गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी
जे जे रुग्णालयात 10 दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर आज सकाळच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली आहे.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेल्वे अपघातात जखमी झालेल्या दिव्या जाधव या तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे. गेले 14 दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र अखेर ती झुंज अपयशी ठरली. 12 जानेवारी रोजी संध्याकाळी दिव्या ही ब्युटी पार्लरच्या क्लासला जात असताना अंबरनाथ-उल्हासनगर दरम्यान लोकलमधून पडून ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणण्यात आलं. मात्र तिथेही ॲम्बुलन्स वेळेत न आल्यामुळे आणि मेडिकलचा मेमो लवकर न दिल्यामुळे ती तब्बल 45 मिनिटं उपचारांअभावी प्लॅटफॉर्मवरच पडून होती. अपघातात जखमी झालेल्या आमच्या मुलीला योग्य वेळेत उपचार दिले असते, तर आमची मुलगी नक्की वाचली असती, असा दावा दिव्याच्या वडिलांनी केला आहे.
अपघातानंतर 45 मिनिटे प्लॅटफॉर्मवरच
तब्बल 45 मिनिटांनंतर दिव्याला आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारांचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे तिला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
मृत्यूशी झुंज अपयशी
जे जे रुग्णालयात 10 दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर आज सकाळच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकाराबाबत अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर रामेश्वर प्रसाद मीना यांना विचारलं असता, दिव्याच्या उपचारात कोणतीही दिरंगाई झालं झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
रेल्वे प्रशासनाने आरोप फेटाळले
आम्हाला माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लोकलने जखमी अवस्थेतील दिव्याला अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणलं. मात्र त्याचवेळी आणखी एक पथक दिव्याला आणण्यासाठी रवाना झालं होतं.
या पथकात ड्युटीवरील स्टेशन मास्तरही असल्यामुळे मेडिकल मेमो देण्यास उशीर झाला, असं त्यांनी सांगितलं. मात्र या सगळ्यात निष्काळजीपणा नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी असमर्थता दर्शवली.
तर याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या सगळ्या प्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची किंवा पोलिसांची चूक असेल तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वेतील कोणी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात लक्ष घालतात का? हे आता पाहावं लागेल.