जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहिण भावापैकी बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळागावात घडली आहे. मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे असे मयत 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. या दुर्देवी अपघातात तरुणीचा भाऊ सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.
जळगाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलावर हा आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिवकॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर एमएच 19 सीवाय 3311 या क्रमाकांच्या डंपरने मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
डंपरची धडक बसताच दुचाकीवरील तरुणी रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिसांनी तरुणीचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी सदर डंपर ताब्यात घेतला असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.