पुण्यात कोयता गँग सक्रिय, कात्रज परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला
पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोयता गँगची दहशत रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
पुणे / अभितीत पोते : पुण्यात कोयता गँगची दहशत थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. मागील काही दिवस कोयता गँगचा उपद्रव थांबल्याचे चित्र होते. मात्र कात्रज परिसरात कोयता गँगने पुन्हा एकावर हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. टोळीतील तिघा जणांनी एका तरुणाला टार्गेट केले आणि त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात कोयता गँगसारख्या गुन्हेगारी टोळ्यांनी घातलेला हैदोस रोखण्याचे मोठे आव्हान स्थानिक पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
कात्रज परिसरात कोयता गँगकडून तरुणावर हल्ला करण्यात आला. यात विशाल विठ्ठल धुळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणाची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे पंचनामा केला.
पोलिसांनी परिसरातील स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवून घेतले असून, तीन अल्पवयीन हल्लेखोरांविरूह गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सुरु असून, हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. तिन्ही हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून समजते.
पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून केली होती कारवाई
शहरात कोयता गँगचा उपद्रव वाढल्यानंतर पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत कोंबिंग ऑपरेशन राबवून संशयितांना तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्या कारवाईनंतरही हल्लेखोरांचा सुळसुळाट सुरूच असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहेत. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन तीव्र करून कोयता गँगच्या मुसक्या आवळण्याचा पवित्रा घेतला आहे.