जोधपूर : लग्नानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात पत्नीसोबत डान्स करण्यास रोखले म्हणून तरुणाने महिलेच्या पतीचे डोकेच फोडल्याची घटना राजस्थानमधील जोधपूरमध्ये घडली आहे. जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला. रोहन असे मयत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. साहिल आणि विक्रम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
महामंदिर पोलीस ठाण्याअंतर्गत रातानाडा हरिजन वस्तीत 6 नोव्हेंबर रोजी लग्नानिमित्त संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तीत राहणारा साहिल दारुच्या नशेत रोहनच्या पत्नीसोबत डान्स करु लागला. यादरम्यान तो अश्लील कृत्य आणि छेडछाडही करत होता.
डान्स करताना साहिलने गैरवर्तन केल्याने रोहन आणि अन्य लोकांनी त्याला रोखले. यानंतर साहिल आणि रोहन यांच्यात बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की सुरु झाली. यानंतर रागाच्या भरात साहिल तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी साहिलने रोहनला भेटून रात्रीच्या कृत्याबद्दल माफी मागितली.
माफी मागितल्यानंतर दुसऱ्या दिवशी साहिल काही लोकांना सोबत घेऊन रात्री चारण सभा भवनबाहेर गेला. यानंतर साहिलने पुन्हा रोहनशी भांडण सुरु केले. यादरम्यान साहिलने विक्रमवर लोखंडाच्या सळीने हल्ला केला. यात रोहन गंभीर जखमी झाला.
रोहनच्या भावाने जखमी अवस्थेत त्याला एमडीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली. यानंतर उपचारादरम्यान पहाटे रोहनचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.