कल्याण : अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या (Molestation) तरुणाचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात (Mahatama Phule Police Station) छेड काढणाऱ्या रोडरोमिओविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तरुणाला मारहाण करणाऱ्या मुलीच्या वडिलांसह आरोपीच्या दोन मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पश्चिम राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीची नुपूर चव्हाण नावाचा तरुणा येता जाता रस्त्यावर छेड काढत होता. अनेक वेळा समजावूनही तो ऐकत नसल्याने पीडित मुलीने शेवटी सर्व प्रकार घरातील लोकांना सांगितला.
हे ऐकताच संतप्त मुलीच्या बापाने आपल्या काही मित्रांना बोलावून घेत छेड काढणाऱ्या नुपूरचे कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातून अपहरण केले आणि त्याला एपीएमसी मार्केटच्या आवारात घेऊन गेले. त्याठिकाणी नुपूरला बेदम मारहाण केली.
मार्केट परिसरात मारहाण होत असल्याने लोकांनी मध्यस्थी करत तरुणाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी छेड काढणाऱ्या नुपूर चव्हाणच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मात्र कायदा हाती घेत अपहरण करून मारहाण करणाऱ्या मुलीच्या बापासह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलीच्या वडिलांना आणि त्यांच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.