अभिषेक घोसाळकर प्रकरणात पकडलेल्या आरोपीचा आरडाओरडा, पोलिसांच्या ताब्यात देताच म्हणाला…
शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात एका आरोपीला पकडण्यात आलं आहे. त्या प्रकरणाला दोन दिवस उलटून गेले आहेत. आता पोलीस या आरोपीची कसून चौकशी करत आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र कोठडी सुनावल्यानंतर आरोपीने आरडाओरड सुरु केला.
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाला आता दोन दिवस उलटले आहे. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा याच्या अंगरक्षकाला अटक केली होती. शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत त्याला पकडलं होतं. कारण मॉरिसने ज्या बंदुकीने गोळ्या झाडल्या ती बंदूक अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याची होती. अटक केल्यानंतर आरोपीला आज बोरीवली दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन महिन्यांपूर्वीच मॉरिस नोरोन्हाचा अंगरक्षक म्हणून अमरेंद्रने कामाला सुरुवात केली होती. शस्त्र त्याच्या मालकीचे होते आणि उत्तर प्रदेशचा परवाना आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरिसने याच बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
पोलिसांच्या वकिलांनी कोर्टापुढे बाजू मांडताना सांगितलं की, भाईंदर पूर्व येथे राहणारा मिस्रा याने सादर केलेला बंदुकीचा परवाना खरा आहे की खोटा याची पडताळणी करणं गरजेचं आहे. याबाबत संबंधित चौकशीसाठी यूपी अधिकाऱ्या विचारणा करण्यात येणार आहे. मिश्रा आमि मृत मॉरिस यांच्या काही आर्थिक व्यवहार झाले आहेत याची खातरजमा पोलीस करत आहेत. कारण त्याने मॉरिस हत्यार का दिलं आणि त्या शस्त्राची मुंबईत नोंद का झाली नाही? हा देखील प्रश्न आहे. पगार आणि इतर बाबींचा तपासही केला जाईल.
दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपी अमरेंद्रने आरडाओरड सुरु केली, “मला फसवलं जात आहे. माझ्यावर अन्याय होत आहे. मला चुकीच्या पद्धतीने गोवलं जात आहे.” पोलिसांनी तात्काळ मिश्राला ताब्यात घेतलं. आता पोलीस या प्रकरणाची आणखी खोलात जाऊन चौकशी करणार आहेत. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते का? की हे प्रकरण येथेच थांबते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान मॉरिस नोरोन्हा याचं पार्थिव महालक्ष्मी येथील दफनभूमीत दफन केलं गेलं. बोरीवली आयसी कॉलनीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.