सावकारी लायसन्स मिळवण्यासाठी लाचेची मागणी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील लिपिकाला रंगेहाथ पकडले !
सावकारी लायसन्स मिळवून देण्यासाठी लाच मागणे लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. एसीबीने कारवाई करत तुरुंगात रवानगी केली.
पुणे : पुण्याच्या वेल्हा तालुक्यात सावकारी लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर असे लाच मागणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. लिपिकाने 55 वर्षीय तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या निदर्शनाखाली पुणे विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप व्हराडे करत आहेत.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना सावकारी लायसन्स काढायचे होते. या कामासाठी ते सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या वेल्हे येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी लिपिक पंढरीनाथ तमनर यांनी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करुन लायसन्स मिळवून देण्यासाठी 30 हजार रुपये आणि त्यांच्या स्वतःसाठी 20 हजार अशी 50 हजारांची मागणी केली. ही रक्कम अन्य व्यक्तीच्या खात्यावर जमा करायला सांगितली होती. तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर पुणे एसीबीने वेल्हा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून लिपिकास अटक केली आहे.
नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नाशिकमध्ये एसीबीने मोठी कारवाई करत नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजाराची तर लिपिकाला 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात तब्बल 85 लाख रुपये रोख रक्कम आणि 32 तोळे सोनं अशी मालमत्ता आढळली आहे. तसेच धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.