यमुनानगर : कावड यात्रेदरम्यान एका होंडा कार (Honda Car)ने पाच जणांना चिरडल्याची घटना यमुनानगरमध्ये रविवारी सायंकाळी घडली आहे. भरधाव वेगातील होंडा सिटी कारवरील चालकाचे नियंत्रण (Control) सुटले आणि या कारने रस्त्याशेजारून निघालेल्या पाच जणांना चिरडले. या अपघाता (Accident)नंतर परिसरातील नागरिक तसेच अपघातग्रस्तांचे नातेवाईक संतप्त झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. संतप्त जमावाने रागाच्या भरात अपघाताला कारणीभूत ठरलेली होंडा सिटी कार पेटवून दिली. यमुनानगरच्या प्रसिद्ध एसके रोडवरील धौलरा गावात हा भीषण अपघात झाला. कारच्या धडकेत 3 यात्रेकरु गंभीर जखमी झाले असून दोघांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे.अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याचा फवारा करून कारला लागलेली आग विझवली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
होंडा सिटी कार पेटवून दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. कार पेटवून देताना मोठा जमाव रस्त्यावर होता. अपघातानंतर पळून गेलेला चालक हाती न लागल्यामुळे नातेवाईकांना आपला संताप नियंत्रणात ठेवणे कठीण गेले. त्या रागात कार पेटवण्यात आली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. राज्यात शासनाकडून कोणतीही सुविधा दिली जात नसल्याचे कावड यात्रेकरुंनी सांगितले. तसेच यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी कोणतीही योग्य व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हा अपघात झाला, तर उत्तर प्रदेश सरकारने यात्रेकरुंसाठी उत्तम व्यवस्था केली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच रादौर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजकुमार यांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमींना उपचारासाठी यमुनानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच एसडीएम रादौर सतेंद्र सिवाच आणि डीएसपी रादौर रजत गुलिया हे देखील मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार चालकावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यात्रेकरुंना दिले. मात्र त्यांच्या आश्वासनानंतरही यात्रेकरुंनी रास्ता रोकोतून माघार घेतली नाही. परिणामी रादौर येथील एसके रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासन्तास वाहन चालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक मार्गही वळवले. (Accident during Kavad Yatra in Yamunanagar, Five people injured)