घरात झोका खेळत होता 14 वर्षाचा मुलगा, खेळता खेळता क्षणात होत्याचं नव्हतं झालं
मयत शंकर हा इयत्ता नववीत शिकत होता. खामगाव शहरातील जुना फैल भागात शिंदे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. आई-वडिलांसह घरातील सर्व मंडळी नातेवाईकांच्या लग्नासाठी अकोला येथे गेले होते.
बुलढाणा : घरात झोका खेळत असताना दोरीचा गळफास लागून 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडली आहे. शंकर प्रकाश शिंदे असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरातील सर्व मंडळी लग्नाला गेली होती
मयत शंकर हा इयत्ता नववीत शिकत होता. खामगाव शहरातील जुना फैल भागात शिंदे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. आई-वडिलांसह घरातील सर्व मंडळी नातेवाईकांच्या लग्नासाठी अकोला येथे गेले होते. यावेळी शंकर आणि त्याचे वृद्ध आजी आजोबा तिघेच घरी होते.
शंकरच्या घराशेजारी मंदिराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करुन शंकर घरी आला. त्यानंतर खोलीतील पंख्यासा दोरी बांधून तो झोका खेळत होता.
झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला
झोका खेळताना झोक्याची दोरी पंख्याच्या पातीला अडकल्याने शंकरच्या गळ्याला दोरीचा फास बसला. ही बाब लक्षात येताच त्याला तात्काळ खामगाव सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू
कुटुंबीयांसोबत पिकनिकला लोणावळ्यात गेलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी लोणावळ्यात घडली आहे. सर्व कुटुंबीय नाश्ता करत होते. यावेळी चिमुकली स्विमिंग पूलजवळ गेली.
अचानक ओरडण्याचा आवाज आला म्हणून स्विमिंग पूलजवळ जाऊन पाहिले असता मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडलेली आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिचा मृ्त्यू झाला होता.