रणजीत जाधव, पिंपरी चिंचवड : प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी काही विशेष सूचना दिल्या जातात. त्यामध्ये दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट हे बंधककारक केले आहे. त्यामुळे अनेक अपघातात हेल्मेट असल्याने अनेकांचे प्राण वाचले आहे. याशिवाय दुचाकी चालवत असतांना मोबाइल वापर टाळावा अशाही सूचना दिल्या जातात किंवा तसे फलकही अनेक ठिकाणी लावलेले असतात. मात्र, याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या जिवावर बेतलं आहे. असाच एक अपघात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आल्याने दुचाकी चालक फोनवर बोलत भरधाव वेगाने जात असल्याचे समोर आले आहे. त्यात दुचाकी चालकाने हेल्मेटचा वापर न केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी थेट स्कूलबसच्या मागच्या बाजूला धडकल्याने तो स्कूल बसच्या मागच्या चाकाखालीच आल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. या घटनेने नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड येथील काटे पुरम चौकात झालेल्या अपघातात भरधाव वेगाने दुचाकी चालवणारा चालक् शैलेश जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
परिसरात असलेल्या रामकृष्ण मंगल कार्यालय येथून शैलेश हा 29 वर्षीय तरुण फोनवर बोलत काटे पुरम चौकातून जात होता, त्यावेळी हा अपघात झाला आहे.
शैलेश याच्या एका हातात मोबाइल आणि एका हातात दुचाकीचे हँडल होते, यामध्ये फोनवर बोलत असतांना पुढे स्पीड ब्रेकरच्या सफेद पत्त्यांवरून तो थेट स्कूलबसच्या चाकाखाली गेला आहे.
हा अपघातानंतर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर जमले होते, शैलेश याचे डोके थेट स्कूलबसच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून ही घटना कशी झाली याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळण्यास मदत झाली आहे, पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.