चेन्नई : आरबीआयने चेन्नईतील एका बोगस बँकेचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. चंद्रबोस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या बँकेच्या 8 ठिकाणी शाखा असून, या बँकेत आतापर्यंत 2 कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन झाले आहे. इकतेच नाही बँकेकडून बेकायदेशीर गोल्ड लोन, एफडी, विकली लोन, पर्सनल लोन आदी कर्ज सुविधा देण्यात येत होती.
आरबीआयने चेन्नईत ‘रुरल अँड अॅग्रीकल्चर फार्मर्स को-ऑपरेटिव्ह बँक’ (RAFC) नामक बोगस बँक सुरु असल्याची माहिती चेन्नई पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा या बँकेचा पर्दाफाश झाला.
आरोपी चंद्रबोस हा बोगस कागदपत्रांच्या आधारे ही बँक चालवत असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चंद्रबोसला अटक केली आहे. यावेळी आरएएफसी बँक ही आरबीआयद्वारे सहकारी संस्था म्हणून नोंदणीकृत असल्याचा दावा आरोपीने केला.
चंद्रबोस हा त्याच्या बँकेत खाते खोलणाऱ्या खातेदारांना आयसीआयसीआय बँकेचे कार्ड देत असे. चंद्रबोसकडून पोलिसांनी 56 लाख रुपये हस्तगत केले आहेत. मुख्य आरोपीला अटक झाली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेत आतापर्यंत दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तसेच गोल्ड लोन योजना, एफडी, साप्ताहिक कर्ज, वैयक्तिक कर्ज अशा सुविधाही बँकेकडून पुरविण्यात येत होत्या.