कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. डोंबिवली सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली होती. त्यानंतर कल्याणात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. आता पुन्हा एकदा कल्याण शहर हादरल आहे. एका 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. इतकंच नाही तर अत्याचारानंतर तिची गळा चिरून हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह कल्याण रेल्वे स्टेशन परीसरातील एका इमारतीच्या परिसरात आढळून आला होता. याप्रकरणी आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सूरज शंकर सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा असे आरोपीचे नाव असून, तो विकृत असल्याचं समोर आलं आहे. याआधीही त्याने बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे.
मागील 14 नोव्हेंबरलाच तो शिक्षा भोगून जेलबाहेर आला होता. अन् लागलीच त्याने हा गंभीर गुन्हा केला. इतकंच नाही तर बकरीसोबत देखील अनैसर्गिक कृत्य केलं होतं.
मयत मुलीची आई ही स्टेशन परीसरात असलेल्या आभा इमारतीच्या आवारात असलेल्या फुटपाथवर आपला पती, मयत मुलगी आणि इतर दोन मुलांसह झोपली होती. हे कुटुंब फिरस्ता आहे. यावेळी आरोपी हा तिथे आला त्याने मुलीला उचललं आणि इमारतीच्या मागील बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर अत्याचारानंतर तिच्या गळ्यावर देखील सपासप वार करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरवात केली. यावेळी एका संशयितला सुद्धा ताब्यात घेण्यात आले होते.
आरोपीने तशी कबुलीही दिली होती. मात्र पोलिसांना पोलिसांना संशय आला आणि पुन्हा तपास सुरू केला. मूळ आरोपी पोलिसांपासून खूप लांब होता. या घटनेच्या तपासासाठी 10 पथकं तयार करण्यात आली होती.
कल्याण, आंबिवली, शहाड, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर, कर्जत ते सीएसटी, कल्याण ते कसारा, कळवा मुंब्रा झोपडपट्टी, भिवंडी सर्व परीसर पिंजून काढण्यात आला. सीसीटीव्ही तपासण्यात आले.
विविध गुन्ह्यांतील सुटलेल्या आरोपींची देखील माहिती गोळा करण्यात आली होती. आरोपीने कोणताच पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. अखेर आरोपीचे फुटेज प्राप्त झाले.
ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. महात्मा फुले पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकारण विभागाला प्राप्त झालेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा शोध लागला.
त्यानुसार भिवंडी आणि मध्यप्रदेश या ठिकाणी पोलिसांचे 2 पथक रवाना झाले. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी धाड टाकण्यात आली. अखेर भिवंडी येथून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
सूरजला कोर्टात हजर केलं असता त्याला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुढील तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होणमाने करत आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं पोलिसांनी सांगितले.