फुकट दारू दिली नाही म्हणून वाईन शॉपच पेटवले, घटना सीसीटीव्हीत कैद
दारु दिली नाही म्हणून वाईन शॉप पेटवल्याची धक्कादाक घटना कराडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
कराड / दिनकर थोरात : फुकट दारू दिली नाही म्हणून चक्क वाईन शॉपच पेटवल्याचा धक्कादायक प्रकार कराड तालुक्यात घडला आहे. वाईन शॉपची तोडफोड करुन शॉप पेटवून देतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आगीत वाईन शॉपचे तीन लाखाचे नुकसान झाले असून, कराड पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे. गणेश पाटील असे माथेफिरु मद्यप्रेमीचे नाव आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
कराड-पुणे-बंगलोर महामार्गावर घडली घटना
कराड-पुणे-बंगलोर महामार्गावर नारायणवाडी गावच्या हद्दीत पवन वाईन शॉप नावाचे दुकान आहे. येथे गणेश पाटील हा व्यक्ती दारू मागण्यासाठी आला होता, मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने शॉप मालकाने दारू दिली नाही. याचा राग मनात धरून गणेश पाटील याने रात्री येऊन वाईन शॉपलाच आग लावली.
आग लावतानाची घटना सीसीटीव्हीत कैद
आग लागल्याचे वेळेत लक्षात आल्याने स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दालने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरु केले. काही वेळात आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आले. आग लावल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे कराड तालुका पोलिसांनी गणेश पाटील याला अटक केली आहे. या घटनेत वाईन शॉपचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.