‘हॅलो, गौरीचे आई-बाबा मी तुमच्या मुलीची हत्या केलीय’, जावयाच्या फोनने एकच खळबळ, काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 28, 2025 | 12:52 PM

बंगळुरुत झालेल्या या हत्येच पुण्याशी काय कनेक्शन आहे?. राकेशने बायकोच्या पालकाना फोन करुन तिची हत्या केल्याची माहिती दिली, त्यानंतर हा भयानक गुन्हा उजेडात आला.

हॅलो, गौरीचे आई-बाबा मी तुमच्या मुलीची हत्या केलीय, जावयाच्या फोनने एकच खळबळ, काय आहे प्रकरण?
Gauri Khedekar alias Gauri Anil Sambrekar
Follow us on

बंगळुरुत पत्नीची निर्घृण हत्या करुन पुण्यात पळून आलेल्या आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राकेश असं आरोपीच नाव आहे. राकेशने विष प्राशन करुन स्वत:च जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राकेशचा कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआरवरुन माग काढत सातारा पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. राकेशने पत्नीची निर्घृण हत्या केली. नंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला व तो पुण्याला निघून आला.

राकेशने बायकोच्या पालकाना फोन करुन तिची हत्या केल्याची माहिती दिली, त्यानंतर हा गुन्हा उजेडात आला. 32 वर्षाची पीडित गौरी अनिल सांबेकर मास मीडिया आणि कम्युनिकेशनची पदवीधर आहे. ती बेरोजगार होती. घरीच होती. राकेश एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला होता. राकेश आणि गौरी हे मूळचे महाराष्ट्रातले. हुलीमाऊ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दोड्डाकन्नाहल्ली येथे ते मागच्या दोन महिन्यांपासून राहत होते.

नंतर तिचा गळा चिरला

पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश आणि गौरी सतत भांडायचे. भांडणाच्यावेळी गौरी राकेशला मारहाण करायची. 26 मार्चला दोघांध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात राकेश चाकू घेऊन आला, त्याने गौरीला पोटात भोसकलं नंतर तिचा गळा चिरला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला व पुण्याला निघून आला.

संपूर्ण शरीरावर जखमा

“हुलीमाऊ पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घर बंद होतं. सूटकेस बाथरुममध्ये आढळली. FSL टीमने सूटकेस उघडली. त्यात गौरीचा मृतदेह होता. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या” असं पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितलं. राकेश गुन्हा करुन फरार झालेला. पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या सीडीआर वरुन पुणे पोलिसांना अलर्ट केलं. त्यांनी राकेशला अटक केली. पुढील चौकशीसाठी हुलीमाऊ पोलिसांची टीम पुण्यावरुन त्याला बंगळुरुला घेऊन आली.