अमृतसर : पंजाबमध्ये आज पोलिस आणि गुंडांमध्ये तुफान चकमक (Encounter) उडाली. त्यात चार शार्पशूटर्स (Sharpshooters) ठार झाले आहेत. यात गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा समावेश आहे. मनप्रित सिंग उर्फ मन्नू कुसा आणि जगरु सिंग ऊर्फ रुपा अशी मूसेवाला हत्याकांडातील मयत आरोपींची नावे आहेत. तसेच चकमकीत गोळी लागून एका पत्रकारा (Journalist)ला गंभीर दुखापत झाली असून अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. अमृतसरमधील चिचा भकना गावात पोलिस आणि गॅगस्टर्समध्ये ही चकमक झाली आहे. या घटनेने संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. चिचा भकना गावात सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी संबंधित गुंड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस त्या गुंडांचा शोध घेण्यासाठी गावात आले होते. त्याचदरम्यान पंजाब पोलिसांवर गुंडांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक उडाली. त्यात पत्रकारही जखमी झाल्याचे पंजाब पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.
कुख्यात गुंड गावात लपून बसल्याची खबर पोलिसांना गावकरी लोकांनी दिली होती. त्याआधारे पोलिसांनी गावाला घेराव घालून कारवाई सुरू केली होती. याचदरम्यान गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनीही गोळ्या झाडल्या. या चकमकीने संबंधित गावासह आसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली. गोळीबार करणारे गुंड कुठे लपले आहेत, याचा थांगपत्ता लावण्यासाठी पोलिसांनी भ गावाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. हे गाव पाकिस्तान सीमेजवळील अटारीजवळ आहे. गुंडांनी एके-47 च्या साहाय्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.
चिचा भकना गावात पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सची कारवाई अजूनही सुरू आहे. पोलिसांकडून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच हत्याकांडातील मारेकरी चकमकीत मारला गेला आहे. या चकमकीमुळे गुंडांचे धाबे दणाणले आहेत.
गोळीबाराच्या आवाजाने चिचा भकना गावासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोलिस आणि गुंड अशा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 100 राउंड फायर करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले आहेत. पोलिसांनी गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. डझनभर वाहनांच्या ताफ्यासह पोलीस फौज चकमकीच्या ठिकाणी दाखल झाली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि चिलखती वाहनेही तैनात आहेत. (Accused in Musewala murder case killed in encounter, four start encounter in Attari)