Kalyan Crime : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेरायचा, मग भूलथापा देत अंगावरील दागिने घेऊन पसार व्हायचा !

| Updated on: Jul 29, 2023 | 11:48 AM

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेरुन भूलथापा देत त्यांचे दागिने लुटण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Kalyan Crime : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेरायचा, मग भूलथापा देत अंगावरील दागिने घेऊन पसार व्हायचा !
कल्याणमध्ये विद्यार्थ्यांना लुटणारा अटक
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण / 29 जुलै 2023 : अंगावर दागिने घालून शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरून ‘पुढे तुम्हाला काही लोक शोधत आहेत, तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा’ यासारख्या भूलथापा देत त्यांना बोलण्यात गुंतवायचा. मग त्यांचे दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या आरोपीला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. नासिर बादशहा शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला कल्याण क्राईम ब्रँच पोलिसांनी घाटकोपरमधून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे, भांडुप, मुलुंड, नवघर, दिंडोशी आदि पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत. आरोपीने अजून किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

काळा तलाव परिसरात विद्यार्थ्याला लुटल्यानंतर घटना उघडकीस

काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील टिळक चौक परिसरात राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी शिवाजी चौकाकडून घरी जात असताना त्याला एका तरुणाने हटकले. काळा तलाव कुठे आहे असे विचारत त्या बाजूला एका मुलीची छेड काढणाऱ्या मुलाचा शोध जमाव घेत आहे, तो मुलगा तुझ्यासारखा दिसतो. त्यामुळे तू जमावाच्या हाती लागल्यास तुला मारतील. त्याऐवजी आपण त्यांच्याशी बोलू यासारख्या भूलथापा देत त्याला काळा तलावाच्या दिशेने नेले.

मग रस्त्यात मध्ये थांबवून गळ्यातील चैन बॅगेत काढून ठेव असे सांगत ती बॅग रस्त्यातील एका दुकानात ठेवत त्याला पुढे नेले. थोडे पुढे गेल्यानंतर या विद्यार्थ्याला आपण त्यांच्याशी बोलून त्यांना समजावतो, तू इथेच थांब असे सांगत त्याला रस्त्यात सोडून माघारी येत त्याची बॅग घेऊन नासिर पळून गेला. बराच वेळ तो परत न आल्याने या विद्यार्थ्याने माघारी येऊन बॅगेची चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी या विद्यार्थ्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. बाजारपेठ पोलिसांसह हा गुन्हा उघड करण्यासाठी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास सुरू केला. या तपासा दरम्यान या पथकात असलेले पोलीस हवालदार विनोद चन्ने यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी नसीम शेख घाटकोपरमध्ये असल्याची माहिती मिळाली.

घाटकोपरमधून सापळा रचून आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अनुप कामत, प्रशांत वानखेडे, विजय नवसारे, गोरखनाथ पोटे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुचनेनुसार लगेचच घाटकोपर परिसरात सापळा रचत नासिर शेख याला ताब्यात घेत अटक केली. पुढील चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना हेरून लुटल्याचे कबूल केले. सध्या हा आरोपीवर ठाणे नगर, भांडुप, मुलुंड, नवघर, दिंडोशी सह इतर ठिकाणच्या पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. कल्याण गुन्हे शाखाने या आरोपीला कल्याण बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास आता बाजारपेठ पोलीस करत आहे.